खून प्रकरणी जन्मठेप झालेल्या आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मंजूर

सोलापूर : प्रतिनिधी
लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडण करू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून आलिम सय्यद याचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेले रामेश्वर चंद्रकांत कुंभार व संतोष मधुकर गाढवे यांच्या अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामीनवर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या खटल्याचे हकीकत अशी की, यातील आरोपी हे एका लग्न समारंभाच्या मिरवणुकीत दारूच्या नशेत नाचत असताना त्यांचे एका सोबत भांडण झाले होते. हे भांडण मयत अलीम सय्यद हा सोडवायला गेला असताना आरोपी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांनी अलीम सय्यद यास शिवीगाळ केली होती. दुसऱ्या दिवशी अलीम सय्यद याने संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांना दारू पिऊन गोंधळ करायला नको होता, मी समजावत असताना मला शिवीगाळ का केली याचा जाब विचारला होता. तू आम्हाला जाब विचारणारा कोण असे म्हणून आरोपींनी अलीम सय्यद याचा चाकूने मारून खून केला, या आरोपाखाली संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांच्यावर खटला भरण्यात आलेला होता. बार्शी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सदर शिक्षे विरुद्ध आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलामध्ये आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठांसमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांची जामीनावर मुक्तता केली.
या प्रकरणी आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. यश फडतरे यांनी तर सरकारतर्फे ॲड. पी.पी. शिंदे यांनी काम पाहिले