महेश मानेना पुन्हा जबाबदारी, जिल्हा सरचिटणीस तथा प्रवक्ता पदावर निवड, काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस तथा प्रवक्ते पदावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते तथा जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे निकटवर्तीय महेश माने यांची शरद पवार यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत गोविंदबाग बारामती येथे निवड करण्यात आली. या वेळी माढा विधानसभेचे नेते संजय कोकाटे, मोहोळ तालुका अध्यक्ष विनय पाटील, माढा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष ऋषिकेश बोबडे, वडाळा ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे आदी उपस्थित होते.
मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एक कार्यक्रमात महेश माने यांनी निष्ठावंतांचा मुद्दा उपस्थित करत नवीन आलेल्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पदाबद्दल प्रश्न उपस्थित करत वाद घातला होता. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे पक्षातून निलंबन व्हावे यासाठी एक गट सक्रिय होता. झालेल्या वादा बद्दल आणि होत असलेल्या अन्यायाबद्दल महेश माने यांनी युवा आमदार रोहित पवार तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली, मुंबई , पुणे तसेच बारामती येथे भेट घेऊन माहिती दिली होती. त्याच बरोबर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह पूर्वीपासून पक्षात सक्रिय असलेले आणि निष्ठेने काम करणाऱ्या लोकांनी महेश माने यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच आमदार जयंत पाटील यांच्या कडे फिल्डिंग लावली होती. त्याचाच भाग म्हणून बारामती येथे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असता शरद पवारांनी महेश मानेंची तात्काळ निवड करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष बळीराम साठे याना दिले. त्यावेळी काका साठेंनी निवडीचे पत्र दिले.
महेश माने यांचे काम मी गेली अनेक वर्षे पाहत आहे. ते त्यांचे काम निष्ठेने आणि चोखपणे करतात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात संघटनेचं काम उत्तम केलं आहे. त्यांच्याकडून घडलेला प्रकार हा उद्विग्नतेतून घडला याची मला जाणीव आहे. शिवाय त्यांनी त्याबद्दल माफी मागितली त्यामुळे त्याविषयीची चर्चा पुन्हा नको. काका साठेंच्या सोबतीला माने सारखे लोक असल्यावर काकांना देखील मदत होते. त्यांचे अधिकार कमी न करता आणि त्यांना कामाचं स्वातंत्र्य देत आहे. महेश तुम्ही पण पूर्वीसारखे सक्रिय राहून तुमचे काम करा पक्षाच्या आणि माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला नक्की न्याय मिळेल. असे शरद पवार यांनी या निवडीच्या वेळी सांगितले.
पक्ष अडचणीत असताना, सत्ता असो किंवा नसो सत्तेचा कधीच मोह न ठेवता आजवर शरद पवार हेच अस्तित्व आणि सर्वस्व मानून काम करत आलो. काका साठे यांनी सांगितलेलं काम आणि दिलेली जबाबदारी कधीच टाळली नाही. जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून पक्षाची बाजूमांडत असताना मुद्देसूद मांडण्याच्या बरोबरच विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. आदरणीय साहेब आणि पक्षाचे विचार ध्येयधोरणे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवले. कार्यालयीन सरचिटणीस म्हणून दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना न्याय दिला. अश्याप्रकारे काम करत असताना झालेला अन्याय सहन न झाल्यामुळे माझ्या भावनेचा उद्रेक झाला. घडलेल्या प्रकारच्या बाबतीत वरिष्ठांची माफी मागितली. अनेक पक्षाकडून पदासाठी ऑफर आली होती. परंतु शरद पवार साहेबांवरील निष्ठेशी आणि काका साठे यांच्या प्रेमाशी कधीच तडजोड करायची नाही. पक्ष आणि साहेब नक्कीच न्याय देतील असा विश्वास होता.
तो आज सार्थ ठरला. आगामी काळात विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वसामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून संधी देत पक्षाला यश प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार. पुनःश्च संधी दिल्याबद्दल जिल्हाध्यक्ष काका साठे , खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांचे मनःपूर्वक आभार. आजवर मला साथ दिलेल्या पक्षातील वरिष्ठांचे, सहकाऱ्यांचे कुटुंबियांचे देखील आभार असे निवडीला उत्तर देताना महेश माने म्हणाले.
यावेळी त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.