5 नोव्हेंबर रोजी खासदार प्रणिती शिंदे यांच्या विषयी गौप्यस्फोट करणार : नरसय्या आडम

सोलापूर : प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यात महायुतीचा पराभव करण्यासाठी प्रादेशिकस्तरावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी गठीत करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), माकप, भाकप, शेकाप, समाजवादी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भाकप (माले), प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन अशा सर्व मित्र पक्षांचा समावेश यामध्ये आहे. अशा महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन प्रचंड मेहनत संसदेत प्रबळ प्रभावी विरोधी पक्ष बनून सरकारवर अंकुश ठेवण्याची सूत्रे हाती घेतली. याकामी मित्र पक्षांची भूमिका अत्यंत व महत्वाची व निर्णायक ठरली.
या महाविकास आघाडीतील घटक पक्ष व मित्र पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सोलापूरात कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीच्या वतीने भव्य पाठींबा देऊन विजय करण्यात मोलाची कामगिरी केली. त्यावेळी सोलापूर शहरमध्य विधान सभा मतदार संघातून कॉ. आडम मास्तर यांना जागा सोडण्यासंबंधी विचार विनिमय झाला. त्या अनुषंगाने
• दि. १५ जून २०२४ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वोच्च नेते मा. शरदचंद्र पवार यांनी सिल्व्हर ओक येथे भेट घेतली.
• दि. २४ जून २०२४ रोजी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांची मुंबई येथे भेट घेतली.
• दि. १० जुलै २०२४ रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली.
• दि. २२ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
• दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी मा. बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.
• दि १४ सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा दिल्ली येथे मा. शरदचंद्र पवार यांची भेट घेतली.
आदीं मान्यवरांना शिष्टमंडळाद्वारे भेटल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत शहरमध्यची जागा हि आडम मास्तरांना सोडण्यात येईल असे ठोस आश्वासन देण्यात आले. या आश्वासनाप्रमाणे माकपा सोलापूर शहरमध्यची जागा सुटेल या भरवश्यावर आडम मास्तर अद्यापही आशावादी आहेत. परंतु २८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा १०.५४ मिनिटांनी कॉंग्रेस पक्षांनी सोलापूर शहरमध्यची जागा स्वतः लढणार असल्याची घोषणा केली. अर्थातच त्यांनी आघाडी धर्म पाळलेला नाही. दिलेल्या शब्दाला जागले नाही. याबाबत चिंता व्यक्त केली.
आजच्या पत्रकार परिषदेत माकप चे शंकर म्हैत्रे, रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार, एम.एच.शेख, युसुफ शेख(मेजर), नलिनीताई कलबुर्गी, नसीमाताई शेख, शेवंतताई देशमुख, सुनंदाताई बल्ला, व्यंकटेश कोंगारी, म.हनिफ सातखेड ॲड. अनिल वासम आदी उपस्थित होते.