अतुल खुपसेची गांधीगिरी, चोराच्या उलट्या बोंबा पैशाची ताकद असे म्हणत स्वतःच्या विरोधातील आंदोलनाला दिला पाठिंबा

सोलापूर : प्रतिनिधी
जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी काही दिवसापूर्वी पुनम गेट येथे अभियंता संजय माळी यांच्या विरोधात अनोखे आंदोलन करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येत अतुल खूपसे यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत आंदोलन केले. परंतु अतुल खूपसे यांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारत स्वतःच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला स्वतः लेखी जाहिर पाठिंबा दिला.
विविध कर्मचारी संघटनेच्या आंदोलनास जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी निवेदन देत जाहीर पाठिंबा दिला, परंतु निवेदन देतेवेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले, मी केलेले आंदोलन अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात होते त्यांचा भ्रष्टाचार मूळ गावी आणि पुणे येथे असलेले प्रॉपर्टी बेहिशेबी मालमत्ता याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केलेली आहे.
ED, सीबीआय कडे पण संजय माळी यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे तशी चौकशी देखील चालू आहे. अनेक कर्मचारी हे या आंदोलनाबाबत नाहक सहभाग नोंदवल्या लागल्याचा बरेच जणांनी फोन करून माहिती दिली. माझे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या विरोधात नसून एकमेव भ्रष्टाचारी संजय माळी यांच्या विरोधात आहे तरी माझा कर्मचारी वर्गास नेहमीच पाठिंबा असतो.
सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्यास जबरदस्ती केल्यास कर्मचाऱ्याप्रमाणे मी ही पाठिंबा दिला आहे इथून पुढे माळी यांनी कर्मचाऱ्यांना जबरदस्ती करून आंदोलनात बोलवले तर कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करावे लागेल. आजच्या निषेध मोर्चाला माझा पाठिंबा आहे चोराच्या उलट्या बोंबा, पैशाची ताकद, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.