मोहोळ तालुक्यात नव्याने मंजुर कऱण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या फेरविचारासाठी खासदार प्रणिती शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सोलापूर : प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. मात्र भौगोलिक दृष्ट्या हे कार्यालय नागरिकांसाठी गैरसोयीचे असल्याने तालुक्यातील नागरिक आणि विविध संघटनाकडून याच्या मंजूरीस तीव्र विरोध केला जात आहे. या प्रकरणी आता खासदार प्रणिती शिंदे यांनी लक्ष घातले असून हे कार्यालय भौगोलिक दृष्ट्या योग्य असलेल्या ठिकाणी व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
मोहोळ तालुक्यातील दक्षिण मोहोळ भागात कुरुल, कामती, बेगमपूर ही मोठी बाजारपेठ असणारी गावे आहेत. या परिसरातील गावांना मोहोळ येथील तहसील कार्यालय खूप दूर व अडचणीचे आहे. या नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी ज्याप्रमाणे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे अप्पर तहसिल कार्यालय कार्यरत होते. त्याच धर्तीवर मोहोळच्या दक्षिण भागातील मध्यवर्ती असे कामती, बेगमपूर (घोडश्वर), कुरुल यापैकी एका ठिकाणी अप्पर तहसिल कार्यालय व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. परंतु, सदरचे कार्यालय अनगर येथे मंजूर झालेले आहे. यावरून मोहोळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, ही समस्या सोडवाण्यासाठी तालुक्यातील काही नागरिक आणि संघटनाकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यावर खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर येथे मंजूर करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिक दृष्टया योग्य नसून मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी हे गैरसोयीचे आहे. त्यामुळे शासनाच्या महसूल विभागाने अनगर येथे मंजूर केलेल्या या तहसील कार्यालयाच्या निर्णयाचा फेरविचार करावा, तसेच तालुक्यातील भौगोलिकदृष्टया योग्य असणा-या ठिकाणी हे अप्पर तहसील कार्यालय करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.