शहरातील तीनही मतदारसंघात पक्ष सांगेल त्या उमेदवारास आणणार निवडून, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा निर्धार

सोलापूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत कोणालाही तिकीट मिळो, शहरातील तीनही मतदारसंघात पक्ष सांगेल त्या उमेदवारास निवडून आणण्या साठी आम्ही प्रयत्न करणार असा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. श्रीकृष्ण मंगल कार्यालयात भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात झाला.
यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर किशोर देशपांडे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, सरचिटणीस रोहिणी तळवळकर, पांडुरंग दिड्डी, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, राम तडवळकर उपस्थित होते.
या मेळाव्याचा समारोप माजी महापौर किशोर देशपांडे यांनी केला. श्री देशपांडे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ कार्यकर्त्यांना पक्षाचे कार्य पूर्वीप्रमाणे त्याच जोमाने करायचे आहे. उमेदवारांची घोषणा झाली की पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रचार सुरु करतील. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हे शिस्तीचे आणि पक्षनिष्ठ आहेत. पक्षात जेष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळते, असेही माजी महापौर किशोर देशपांडे यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय मनोगत शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मांडले. भाजपाच्या सरचिटणीस रोहिणी तडवळकर यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक तर आभारप्रदर्शन पांडुरंग दिड्डी यांनी केले.