सोलापूरक्राईम

माजी नगरसेवक अविनाश बोमडयाल सह इतर 10 आरोपीं संचालकांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला : प्रदिपसिंग रजपूत (जिल्हा सरकारी वकील)

विको प्रोसेसच्या सर्व संचालकांनी मिळून संगनमत करून रु.24,33,86,020/- इतक्या रकमेचा गैरव्यवहार करून सदरची जागा बेकायदेशीर विक्री प्रकरण

सोलापूर : प्रतिनिधी

विको प्रोसेसच्या सर्व संचालकांनी मिळून संगनमत करून रु.24,33,86,020/- इतक्या रकमेचा विको प्रोसेसच्या जागेच्या व्यवहारात गैरव्यवहार करून सदरची जागा बेकायदेशीर रित्या श्री. ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला, अशोक चौक, सोलापूर यांना विक्री करून, त्यातून आलेल्या रक्कमेचा स्वतःच्या फायदयासाठी वापर करून, त्याचा अपहार केल्याने व संस्थेचा विश्वासघात करून संस्थेची फसवणूक केल्याने, बप्पाजी छबुराव पवार, अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-2 सहकारी संस्था (विणकर), सोलापूर यांनी जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर येथे फिर्याद दाखल केली. यात अविनाश प्रकाश बोमडयाल, सहदेव हणमंतु इप्पलपल्ली, संजय भुमय्या कोंडा, यादगिरी बालय्या वडेपल्ली, सर्वेशाम शंकरराव येमूल, श्रीहरी हणमय्या इराबत्ती, व्यंकटेश बालाजी बोगा, लक्ष्मीनारायण शंकर देवसानी, वेणूगोपाल केशव अंकम, सौ. कल्पना श्रीधर रापोल, सौ. मंगम्माबाई कष्णहरी आडम यांची नावे आहेत.

सदर पोलीसांनी विको प्रोसेसच्या सर्व संचालकांच्या विरूध्द गु.नों.क्र.88/2024, भा.द.वी., कलम 420, 409 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. सदर प्रकरणात विको प्रोसेसच्या सर्व संचालक आरोपींना अटक होण्याची भिती निर्माण झाल्याने, त्यांनी न्यायालयात धाव घेवून, अटकपूर्व जामीन मिळणेसाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केलेला होता. सदर अर्जास सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी सक्त हरकत नोंदवत सरकार पक्षाचे म्हणणे सादर केले आणि युक्तीवाद केला की, सदर विको प्रोसेसची जागा ही सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित सोलापूर यांच्या मालकिची असून, या संस्थेचे चेअरमन, व्यवस्थापक, संचालक मंडळ व इतर लाभार्थ्यांनी मिळून आपसात संगनमत करून दि.01/04/2021 ते 31/03/2022 या कालावधीत रू. 24,33,86,020/- इतक्या रकमेचा अपहार केलेला आहे. सदर संस्थेच्या मालकिची 87000 चौरस फूट जागा ही बेकायदेशीररित्या विक्री केलेली आहे. सदरची जागा विक्री करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन केलेले नाही. ई-टेंडर प्रक्रिया मागविलेली नाही. सदर विको प्रोसेसच्या जागेचे बाजारमुल्य हे रू. 28,35,00,000/- इतके असताना तसेच इमारतीचे बाजारमूल्य रू. 1,41,78,020/- असताना (असे एकूण मूल्य रु.29,76,78,020/-) असताना, सदरची जागा फक्त 14 कोटी रूपयांस विक्री करून, सदर संचालकांनी संस्थेचे रू. 14,35,00,000/- रूपयांचे आर्थिक नुकसान केलेले आहे. सदर प्रकरणात सन 2010 साली 69120 चौरस फुट जागेसाठी निविदा मागविण्यात आली होती. त्याच निविदेच्या आधारावर सदर संस्थेने सदरची जागा सन 2021 साली बेकायदेशीररित्या विकलेली आहे.

वास्तविक पाहता, सदर प्रकरणात पुन्हा नवीन निविदा मागवून जागेची विक्री करणे अपेक्षित होते. तसेच सदर जागेच्या सन 2010 च्या लिलाव प्रक्रियेमध्ये श्री. ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला, अशोक चौक, सोलापूर या संस्थेने भाग घेतलेला नसताना देखील, त्यांना सदरची जागा बेकायदेशीररित्या विक्री केलेली आहे. सन 2013 मध्ये सदर संस्थेच्या 18000 चौरस फुट जागेसाठी निविदा मागविण्यात आली होती. त्यामध्ये श्री. रैल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला, अशोक चौक, सोलापूर या संस्थेने सहभाग घेतला होता. परंतु, सदर संस्थेने विको प्रोसेसची 87000 चौरस फुट जागा बेकायदेशीररित्या सर्व संचालकांशी संगनमत करून विकत घेतली आहे. सदर विको प्रोसेसच्या जागेमध्ये जुनी इमारत होती. त्याचे पाडकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निविदा मागविली नाही. सदर इमारतीच्या पाडकामातून विटा, दगड, स्टील पत्रे इ. साहित्यांची परस्पर विक्री केली व त्यातून मिळालेली रक्कम संस्थेमध्ये जमा न करता, सर्व संचालकांनी स्वतः वापरली. सदर संस्थेच्या सर्व संचालकांनी कोरोना काळात मिटिंग घेतल्याचे दाखवून मिटिंग भत्यापोटी अवास्तव रक्कम स्वीकारून देखील संस्थेची फसवणूक केली. तसेच सदर संस्थेचे तत्कालीन चेअरमन यल्लादास गज्जम आणि सचिव रामचंद्र सामलेटी यांनी सदर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी दत्तात्रय गोटीपामूल यांच्याकडून रु.5,00,000/- इसारापोटी स्वीकारली होती. ती रक्कम संस्थेत जमा न दाखविता, त्यांनी देखील सदर रकमेचा अपहार केला. असे असताना, विदयमान संचालक मंडळाने गोटीपामूल यांना रु.5,00,000/- संस्थेच्या खात्यातून बेकायदेशीररित्या दिले आणि सदरचा खर्च विहीर बुजवणी खर्च म्हणून संस्थेत दाखविला.

तसेच सोलापूर जिल्हा विणकर फेडरेशन नियमित या संस्थेचे सभासद संख्या 160 असून त्यापैकी 33 सभासद संस्था हया अवसायनात असल्याने सदर विको प्रोसेसच्या जागेच्या विक्रीतून आलेली रक्कम ही अवसायकाच्या नावाने देणे अपेक्षीत असताना, सदरची रक्कम ही सदर संस्थेचे चेअरमन यांच्या नावाने बेकायदेशीररित्या देवून, सदर रक्कमेचा अपहार केला आहे. त्यामुळे, सदर विको प्रोसेसच्या जागेच्या आणि इमारतीच्या विक्रीमधून आलेल्या रकमेमध्ये अपहार करून, संस्थेची फसणूक केल्याचे सक्रतदर्शनी दिसत असल्याने, आरोपींना अटकपूर्व जामीन देता येणार नाही तसेच सदर सर्व आरोपी संचालक हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून, सदर गुन्हयाच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. सदर आरोपी संचालकांना ताब्यात घेवून त्यांचेकडून अपहार व फसवणूकीची रक्कम रू.24,33,86,020/- ही वसूल करणेची आहे तसेच आरोपींकडून संस्थेचे प्रोसिडींग बुक, कॅशबुक रजिस्टर, लेजर बुक व इतर महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्याची असल्याने, त्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. तसेच सदर विको प्रोसेसच्या जागेच्या विक्रीमध्ये सदरची जागा विकत घेणा-या संस्थेने आरोपी संचालक यांच्याबरोबर संगनमत केले आहे का तसेच सदर गोष्टीसाठी कोण-कोणत्या व्यक्तींनी मदत करून अपहार रक्कम स्वीकारली आहे, याचा देखील तपास सर्व आरोपी संचालक यांच्याकडे करणे आवश्यक आहे. त्यामुळे, सदर आरोपींचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळण्यात यावा.

सदर जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांचा युक्तीवाद ग्राहय धरून कोर्टाने अविनाश बोमडयाल सह इतर 10 आरोपीं संचालकांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळून लावला आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!