माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांना शहर उत्तर विधानसभेबद्दल अॅलर्जी आहे का.? काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
लिंगायत समाज काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा, शहर उत्तर निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक, काँग्रेसच्या दोन्ही अपक्ष उमेदवारांना दिला एकमताने पाठिंबा

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील अत्यंत चर्चेला जाणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे त्याचे कारणही तसेच आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटावा यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न केले.
परंतु ही जागा महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली. परंतु निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते हे मानायला तयार नाहीत त्यापैकी काँग्रेसचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे आणि माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचे अर्जही वैध ठरले.
शहर उत्तर मधील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांविरोधात सूर दिसून आला. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा आहे, तरी राष्ट्रवादीला का सोडला असा कार्यकर्त्यांचा सवाल होता, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांना शहर उत्तर विधानसभेबद्दल अॅलर्जी आहे का.?
मागील दोन टर्म शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पराभूत झाली त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेणे ची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांची होती ती त्यांनी का पार पाडली नाही असा सवाल देखील उपस्थित केला.
महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळालेले महेश कोठे यांनी शहर उत्तर मधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज दाखल केला, प्रचाराला सुरुवात केली याचा अर्थ काय काढायचा.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक प्रकाश वाले आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक धर्मराज काडादी यांना काँग्रेसने उमेदवारी घेतली नाही यामुळे लिंगायत समाज काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा देखील कार्यकर्त्यांनी केली. यावेळी प्रकाश वाले आणि सुनील रसाळे यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस आणि महेश कोठे यांचा समाचार घेतला.
यावेळी सोलापूर शहर उत्तर ई ब्लॉक काँग्रेस कमिटी आयोजित बैठकीचे अध्यक्ष महादेव चाकोते, माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, सुनील रसाळे, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, माजी स्थायी समिती सभापती केदारनाथ उंबरजे, माजी नगरसेवक दत्तूअण्णा बंदपट्टे, अशोक कलशेट्टी, माजी नगरसेविका भारती ईपलपल्ली, संघमित्रा चौधरी, चक्रपाणी गज्जम, राहुल वर्धा, प्रवीण वाले, मल्लिनाथ सोलापुरे, विकी चाकोते, विष्णू मुधळकर, नूरअहमद नालवार, जब्बार शेख, नागनाथ कोप्पा, आधी निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिनाथ सोलापूरे यांनी केले.