विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासू-सासरे निर्दोष मुक्त

सोलापूर : प्रतिनिधी
विवाहिता मेघा जीवन केसकर (वय २८ वर्षे) हिचा मानसिक व शारिरीक छळ व जाचहाट केल्याप्रकरणी पती जीवन नारायण केसकर (वय ३७ वर्षे), सासरे नारायण शंकर केसकर (वय ७५ वर्षे) आणि सासू सुनंदा नारायण केसकर (वय ७३ वर्षे) (सर्व रा. लक्ष्मी पेठ, सोलापूर) यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. प्रशांत वराडे यांनी निर्दोष मुक्तता केली.
याची हकीगत अशी, की विवाहिता मेघा हिला वरील तिन्ही आरोपींनी माहेराहून दहा लाख आणले तरच नांदवून घेऊ अन्यथा तिला बघून घेऊ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. सतत अपमान करुन तिचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला नेसत्या अंगवस्त्रानिशी घरातून हाकलून दिले वगैरे आशयाची फिर्याद विवाहिता मेघा हिने विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर येथे दिली होती. त्यावरुन वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते. तथापि कोणत्याही सबळ व विश्वसनीय पुराव्यानिशी आरोपींविरुद्ध गुन्हा शाबीत होऊ शकत नसल्याचा युक्तीवाद आरोपींचे वकील आल्हाद अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपींचा बचाव ॲड. आल्हाद अंदोरे, ॲड. अथर्व अंदोरे यांनी केला. तर सरकारतर्फे ॲड. जे. व्ही. चेळेकर यांनी काम पाहिले.