नगरपरिषदेच्या कर्मचा-यास धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता

सोलापूर : प्रतिनिधी
आरोपी नामे शरणाप्पा गुरप्पा भासगी रा. अक्कलकोट यास नगरपरिषदेच्या कर्मचा-यास धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोलापुर येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस. खुणे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकिकत अशी की, फिर्यादी अक्कलकोट नगरपरिषद येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. दिनांक 30/12/2017 रोजी सकाळी 7.15 च्या दरम्यान फिर्यादी हा त्याच्या सहकर्मचा-यांसोबत अक्कलकोट येथील सुभाष गल्ली येथे सफाई करत होता. फिर्यादी हा तेथील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करुन कचरा ठेवा. त्यावेळी तेथे राहणा-या आरोपी नामे शरणाप्पा गुरप्पा भासगी याने फिर्यादीस शिवीगाळ केली व जोरजोरात आरडओरडा करुन हल्ला केला अशाप्रकारे सरकारी कामात अडथळा आणला अशा आशयाची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती. सदर कामी पोलीसांनी तपास करुन दोषारोपञ मा. न्यायालयात दाखल केले. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी व तपास अधिकारी हे होते.
फिर्यादी व तपास अधिकारी यांची आरोपीचे वकिल ॲड. अभिजित इटकर यांनी घेतलेली उलटतपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी महत्वाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी मध्ये अनेक बाबींचा खुलासा झाला त्यापैकी काही म्हणजे सदर घटनास्थळ हे अक्कलकोट शहरातील मुख्य रस्त्यावर असुन घटनेच्यावेळेस अनेक रहिवासी तेथे हजर असल्याची बाब साक्षीदारांनी मान्य केली परंतु सरकार पक्षाने घटनास्थळवरील कोणत्याही रहिवाश्याचा जबाब मा. कोर्टासमोर हजर केला नाही. तसेच फिर्यादी हा घटनेच्यावेळी कामावर हजर होता त्याबद्दलचा पुराव्यासंबंधी साशंकता निर्माण केली. तसेच घटनास्थळापासुन पोलीस स्टेशन २ मिनिटांच्या अंतरावर असुनसुध्दा फिर्याद देण्यास ८ तास उशीर झालेला होता.
यात आरोपीपक्षातर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, आरोपीचा सरकारी कामात अडथळा आणण्याचा कुठलाही उद्देश नव्हता. कर्मचा-यांशी झालेला किरकोळ वादाचे रूपांतर खोटया घटनेमध्ये केलेले असुन त्रास देण्यासाठी सदरची खोटी केस दाखल केली. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी.एस. खुणे साहेब यांनी आरोपी नामे शरणाप्पा गुरप्पा भासगी, रा. अक्कलकोट याची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. मल्लिकार्जुन पाटील, अॅड. संतोष आवळे, अॅड. राम शिंदे, अॅड. फैय्याज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.