लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी नक्की येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी नक्की येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांची माहिती
सोलापूर : प्रतिनिधी
प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु आगामी काही दिवसांतच सोलापूरच्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी दिली.
मंगळवारी दौरा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शहर – जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास झाला असून डॉक्टरांनी सांगितल्यामुळे नाईलाजाने मुख्यमंत्र्यांनी सोलापूरचा दौरा रद्द केला. सोलापूरच्या लाडक्या बहिणींना न भेटता आल्याचे दुःख मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना झाले आहे. परंतु काही दिवसांतच ते सोलापूरला येणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे म्हणाले.