उदयन राजेंची मोहीम फत्ते, सातारा, कऱ्हाड, कोरेगावमुळे विजय सुकर

सोलापूर : प्रतिनिधी (सातारा)
लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा तब्बल ३२ हजार ७७१ मतांनी पराभव केला. सुरुवातीला शशिकांत शिंदेंनी १९ हजारांचे मताधिक्य घेऊन आघाडी घेतली आणि विजयी जल्लोषही केला.
पण १४ व्या फेरीनंतर बाजी पलटली आणि उदयनराजेंचे मताधिक्य वाढत जाऊन त्यांनी विजयश्री खेचून आणली. शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का दिला. शिंदेंना वाई, कऱ्हाड उत्तर आणि पाटण मतदारसंघांनी अल्पसे मताधिक्य दिले, तर सातारा, कऱ्हाड दक्षिण व कोरेगाव मतदारसंघांनी उदयनराजेंचा विजय सुकर केला. अटीतटीने आणि चुरशीने झालेल्या या निवडणुकीत तुतारीच बाजी मारेल, अशी चर्चा रंगली होती पण अगदी एक्झिट पोलचे अंदाजही या निकालाने फोल ठरवले.
उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने उशिरा केला होता तर श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणांनी माघार घेतल्यामुळे उमेदवार कोण याचीच चर्चा या मतदारसंघात होती. अर्ज भरण्याच्या तोंडावर उदयनराजे व शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. अटीतटीच्या लढतीत अखेर उदयन महाराज भोसले यांनी मोहीम फत्ते करत विजयश्री खेचून आणला.