विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेवेळी युवासेनेचे तीव्र आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे व्यवस्थापन परिषदेच्या सभेप्रसंगी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती विद्यापीठातील नियोजित स्व बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र रखडल्या संदर्भामध्ये युवा सेनेच्या वतीने युवा सेनेचे सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड आणि युवासेनेच्या सिनेट सदस्य ऍड. उषा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार अवताडे आणि पांडुरंग घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो शिवसेना जिंदाबाद, विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. दीड वर्षापूर्वी झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकी नंतर पहिल्याच व्यवस्थापन परिषदेच्या सभेमध्ये सिनेट सदस्य उषा पवार यांनी सोलापूर विद्यापीठातील अध्यासन केंद्रास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्या मागणीस व्यवस्थापन परिषदेने सर्वानुमते मंजुरी दिली होती. त्यामुळे अध्यासन केंद्रास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले गेले. परंतु दीड वर्षांपासून विद्यापीठ प्रशासनाने स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचे कोणते कोणतेही प्रयत्न केले नाहीत. युवा सेनेच्या वतीने वारंवार या अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला परंतु वेळोवेळी निधीचे कारण देत याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले. याचा जाब आज आंदोलनामध्ये विद्यापीठाचे प्र कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, रजिस्टार योगिनी घारे यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती विचारण्यात आला.
यावेळी त्यांनी यावरती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेत लवकरात लवकर आध्यासन केंद्र सुरू करण्याचे तोंडी आश्वासन दिले.
परंतु 2 ऑक्टोंबरची मुदत युवासेनेच्या वतीने देण्यात आली आहे. 2 ऑक्टोंबर पर्यंत अध्यासन केंद्र सुरू न झाल्यास युवासेनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन विद्यापीठात घेण्यात येईल. असा इशारा युवासेनेचे सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड आणि युवासेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार आवताडे यांनी दिला.
याप्रसंगी युवासेनेचे सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड, युवासेनेच्या सिनेट सदस्य उषा पवार, सुटाचे सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड, सिनेट सदस्य पद्मजादेवी मोहिते पाटील, युवासेना कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार अवताडे, विद्यापीठ कक्षाचे पांडुरंग घोलप, उपाध्यक्ष प्रकाश निळ, महेश भोसले, शिवसेनेच्या महिला आघाडी उत्तर सोलापूर तालुका संघटिका परिणीता शिंदे, अनिरुद्ध दहिवडे, विजय मोटे, नितीन काटकर, दीपक तिवारी, मयुरेश धनगुंडे, क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.