सोलापूरच्या कारागृहात बंदिवानांनी व्यक्त केला समाज अन् देशहिताचा निर्धार
कारागृहात आल्यानंतर खचून जावू नका तर चांगला विचार मनात ठेवा : हरीभाऊ मिंड (अधिक्षक, कारागृह)

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा कारागृहात रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला आयोजन करण्यात आले. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांनी देशासाठी केलेला त्याग, समर्पण ध्यानात ठेवत महिला आणि पुरुष बंदिवान स्पर्धकांनी शिक्षेनंतरच्या उर्वरित आयुष्यात समाज आणि देशहिताचा निर्धार व्यक्त केला.
कारागृहाचे अधीक्षक हरीभाऊ मिंड, तुरुंगाधिकारी प्रदीपकुमार बाबर, सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अभिजीत देवधर, रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि युवा कार्यकर्ते आदित्य देवधर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्पर्धकांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कारागृहातील कर्मचारी वर्गानेही या स्पर्धेत उत्सफूर्त सहभाग घेतला होता.
कारागृहात आल्यानंतर खचून जावू नका तर चांगला विचार मनात ठेवा, शिक्षा भोगल्यानंतर परत समाजात गेल्यानंतर चांगले काम करा, लोकांचा आदर प्राप्त करा, असे अधीक्षक हरीभाऊ मिंड यांनी सांगितले तर अॅड. अभिजीत देवधर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानाच्या कारागृहात राहून आपल्या विचारांनी अनेक देशभक्त घडवले. तसे त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन तुम्ही देखील इथून बाहेर पडून देशकार्याचा निर्धार करा, असे आवाहन केले. रामचंद्र प्रतिष्ठान २०१८ पासून महाराष्ट्रातील सर्व कारागृहातील बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजवत आहे. इथले मनुष्यबळ राष्ट्रीय संपत्ती समजून त्यांनी चांगल्या मार्गाने भविष्यात देशासाठी कार्यरत व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले.
तुरुंगाधिकारी प्रदीपकुमार बाबर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आदित्य देवधर यांनीही स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.