बार्शी महावितरणच्या कारभाराला शेतकरी कंटाळले, शेळगावच्या वयो वृध्द शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा
इशारा देताच, 5 मे रोजी खंडित झालेला वीज पुरवठा 17 मे रोजी जोडण्यात आला

सोलापूर : प्रतिनिधी
शेतामधील तुटलेली तार जोडण्याऐवजी महावितरण कर्मचाऱ्याने चक्क वीजपुरवठाच बंद करून ठेवला. दहा दिवस उलटूनही ती तार जोडली नाही. त्यामुळे पिकाच्या झालेल्या नुकसानी बद्दल भरपाई देण्याची मागणी करत शेळगांवच्या एका वयोवृद्ध शेतकऱ्याने बार्शी महावितरण कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्याचे निवेदन दिले आहे.
हा प्रकार बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील केरबा संभाजी अडसूळ यांच्या मालकीच्या शेतामध्ये ५ मे रोजी घडलेला असून याबाबत महावितरणला कळवले होते. परंतु सदर तार जोडून वीज पुरवठा सुरळीत करण्याऐवजी त्यांच्या शेतातील वीजपुरवठाच बंद करून ठेवल्याने ऐन उन्हाळ्यात जोपासलेल्या तीन एकर ऊस या पिकाला पाणी न मिळाल्याने मोठे नुकसान झाल्याची त्यांची तक्रार आहे.
केरबा अडसूळ यांच्या शेतात वीजेच्या तारा अतिशय कमी उंचीवरून गेलेल्या आहेत. पोल झुकलेले आहेत. तारांमध्ये झोळ पडलेला आहे. त्यामुळे तारा तुटणे, शॉर्ट सर्किट होणे हे प्रकार सन २०१२ पासून सुरू असून यापूर्वी दोन ते तीन वेळा शेतातील कडबा व शेतीतील उपकरणे जळून मोठे नुकसानही झालेले आहे. तेव्हापासून वेळोवेळी अडसूळ यांनी महावितरण कडे लेखी अर्ज केलेल्या असून त्यांच्या पोचही त्यांच्याकडे आहेत.
रीतसर तक्रारी करूनही महावितरण कडून पैसे घेतल्याशिवाय कुठलीही कामे होत नाहीत. पैसे नाही दिले, तर अशा प्रकारची अडवणूक करून नुकसान केले जाते. शेतामधील वीज पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी त्यांना यावेळीही १४ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी आपल्या निवेदनात केला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाला जबाबदार कोण? प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
सन २०१७ मध्ये तर शॉर्ट सर्किट होऊन झालेल्या नुकसानीला महावितरण कंपनीच जबाबदार असून अडसूळ यांना नुकसान भरपाई देण्याचे लेखी आदेश विद्युत निरीक्षक सोलापूर यांनी दिलेले असूनही अद्याप कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाहीच, पण महावितरण कडून होणारा त्यांचा त्रास ही कमी झालेला नाही.
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये भेट देऊन माझ्या अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा बार्शी महावितरण समोर उपोषणाला बसणार असल्याचे शेळगावचे वयोवृद्ध शेतकरी केरबा अडसूळ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी महावितरण शाखा अभियंता वैराग, उप कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता बार्शी आणि बार्शी पोलीस ठाण्याला दिले आहेत. उपोषणाचा इशारा देताच महावितरला जाग आली आणि त्यांनी वीजपुरवठा सुरळीत करून दिला परंतु अद्याप त्यांच्या मागील नुकसानीची भरपाई दिलेली नाही ती द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.