ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आणि मार्कंडेय महामुनींना वंदन करत जय श्रीराम घोषाणा देत आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली शपथ

सोलापूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर आणि कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींना वंदन करत ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी शपथ घेतली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी गोमाता आणि भारतमातेला वंदन करत महापुरुषांनाही अभिवादन केले. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपा आमदार निवडून आल्यामुळे शपथविधीचा कार्यक्रम होताच शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी रविवारी फटाके उडवून मिठाई वाटत जल्लोष केला.
मुंबई येथील विधान भवनात रविवारी आमदारांच्या शपथविधीचा सोहळा झाला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून आज शपथ घेतली. मतदारांच्या आशीर्वादाने आणि माझे पालकत्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज या पदाचा मान मला मिळाला आहे. माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या पुण्याईच्या जोरावरच माझी आजवरची वाटचाल राहिली आहे. आज ही शपथ घेताना प्रभू श्रीराम, श्री स्वामी समर्थ, श्री पांडुरंग, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर, कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना वंदन करून व माझे मार्गदर्शक आजोबा तात्यासाहेब कोठे यांना स्मरून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून ही शपथ घेतली आहे. शपथेच्या शेवटी आमदार देवेंद्र कोठे यांनी गोमाता आणि भारतमातेला वंदन केल्याचेही सांगितले.
यापुढील काळातसुद्धा माझ्या हातून जनहिताची कामे घडावीत, यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विष्णूपंत तात्या कोठे यांची स्वाक्षरी असलेले जॅकेटने वेधले लक्ष
शपथ ग्रहण करताना आमदार देवेंद्र कोठे यांनी आजोबा विष्णुपंत कोठे यांची स्वाक्षरी असलेले जॅकेट परिधान केले होते. यावेळी विधान भवनातील सहकारी आमदारांनी अतिशय उत्सुकतेने या स्वाक्षरीची माहिती घेतली. आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा दिवंगत विष्णुपंत (तात्या) कोठे यांची स्वाक्षरी जॅकेटवर असल्याचे कळताच सहकारी आमदारांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणारे एकमेव आमदार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून मी ही शपथ घेत आहे, असा उल्लेख करून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणारे देवेंद्र कोठे हे विधानसभेतील एकमेव आमदार ठरले.