
सोलापूर : प्रतिनिधी
स्वाती मोहन राठोड हिचे आई वडील हे विजापूर रोड, राजस्व नगर येथे राहतात. याच परिसरात आई वडील दोघे मिळून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. वडील भाजीचा गाडा घेऊन परिसरात भाजी विकत फिरतात. या व्यवसायाला आईचीही मदत असते. आपल्या आई- बाबांचे कष्ट पाहून मी यूपीएससी उत्तीर्ण होईनच अशी जिद्द बाळगत स्वातीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पाचव्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले.
स्वाती राठोड हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण नवी मुंबईतील वाशी येथे झाले. तिथे तिचे वडील मजुरी करत होते. त्यानंतर राठोड कुटुंबीय सोलापुरात स्थायिक झाले. तेव्हापासून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. या दरम्यान स्वातीने भारती विद्यापीठ येते अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले वसुंधरा महाविद्यालयात बीए पूर्ण केले. सध्या भूगोल विषयातून ती एम.ए. करत आहे. तिला एक भाऊ असून दोन बहिणी आहेत.
स्वाती राठोड हिचे सोलापुरातील घर छोटे आहे. यामुळे अभ्यास करताना अडचणी येत होत्या. अभ्यास करताना शांत वातावरण असावे, एकाग्र राहता यावे म्हणून स्वाती व तिच्या पालकांनी पुण्यात भाड्याने रुम घेतली. स्वातीने तिथेच राहून अभ्यास केला. परीक्षा झाल्यानंतर स्वाती सध्या कुटुंबीयांसोबत सोलापुरात आहे.