फिर्यादीचा जीव वाचवणे महत्त्वाचे, फिर्याद घेणे नव्हे : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सोलापूर : प्रतिनिधी
गंभीर जखमीचा जीव वाचवणे याला प्राधान्य देणे महत्त्वाचे असते, फिर्याद घेणे नव्हे असे महत्त्वपूर्ण मत नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने सोलापुरातील एका प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आरोपीस दिलेली ७ वर्षे सक्तमजुरी व आरोपीने जखमीस ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा हुकूम कायम केली.
या प्रकरणाची हकीकत अशी की, फिर्यादी दीपक चव्हाण या परिवहन खात्यातील कंडक्टरने आरोपी रविकांत जत्ती या खाजगी सावकारा कडून पैसे व्याजाने घेतलेले होते. ते परत केले असताना देखील व्याजाच्या रकमेचा घोळ घालून आरोपीने चव्हाण यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. सोलापूर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सौ रेखा पांढरे यांनी आरोपीला ७ वर्षे शिक्षा व आरोपीने जखमी फिर्यादीला ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याबद्दलचा आदेश दिला होता. सदर शिक्षेविरुद्धच्या अपिलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. जखमीला हल्ल्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते, त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर होती, अशा परिस्थितीत त्याचा जीव वाचवण्यास प्राधान्य देणे महत्त्वाचे होते फिर्याद देण्यास नव्हे असे महत्त्वपूर्ण मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते, त्याची गंभीर परिस्थिती बघून पोलिसांनी त्या जखमीस त्वरित दवाखान्यात उपचारासाठी नेऊन दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सारंग कोतवाल यांनी आरोपी रविकांत जत्ती याचे अपील फेटाळून लावले आणि सोलापूर न्यायालयाने दिलेली ७ वर्षाची सक्तमजुरी व ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा कायम केली.
या प्रकरणात मूळ फिर्यादी जखमी दीपक चव्हाण तर्फे ॲड. जयदीप माने , सरकारतर्फे ॲड. रंजना हुमने तर आरोपीतर्फे ॲड. देवकर यांनी काम पाहिले