बांधकाम अर्धवट सोडून साडेतीन लाखांची फसवणूक, निराळे वस्तीतील ठेकेदार दांपत्यावर गुन्हा

सोलापूर : प्रतिनिधी
इमारतीचे बांधकाम करण्यासाठी करार केला, मात्र करारानुसार बांधकाम पूर्ण न करता साडेतीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी ठेकेदार पती व पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २६ डिसेंबर २०१९ ते ४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान निराळे वस्ती, सोलापूर या ठिकाणी घडली आहे.
याबाबत संतराम ऊर्फ शांतिकुमार गुलाब नागटिळक (वय ५४, रा. न्यू बुधवार पेठ, डॉ. आंबेडकर नगर, सम्राट चौक) यांनी फिर्याद दिली असून, राजकुमार भीमाशंकर उडचण व वर्षा राजकुमार उडचण (दोघेही रा. निराळे वस्ती, सोलापूर) यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत शनिवारी (ता. ७) दुपारी गुन्हा नोंद झाला आहे.
फिर्यादीच्या राहत्या घरजागेचे बांधकाम चार लाख ५० हजार रुपयांमध्ये बांधकाम ठेकेदार राजकुमार उडचण यांनी पूर्ण करून देण्याचे ठरवून दिले होते. २६ डिसेंबर २०१९ रोजी बांधकाम करारपत्र करून एक लाख रुपये घेऊन बांधकाम, सुरू केले. त्यानंतर वेळोवेळी रक्कम देण्यात आली. असे एकूण पाच लाख ५४ हजार घेऊन सुद्धा बांधकाम ठेकेदार उडचण यांनी घराचे बांधकाम पूर्ण न करता अर्धवट करून सोडून दिले. राजकुमार व त्यांची पत्नी वर्षा यांनी ‘तुमचे बांधकाम होणार नाही, थोड्या दिवसांनी तुमचा हिशेब करून तुमचे पैसे परत करू, तुम्ही आमच्या घरी यायचे नाही’, असे फिर्यादीस शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच फिर्यादीच्या कामासाठी घेतलेले तीन लाख ५० हजार रुपयेही परत न देता फसवणूक केली, असे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.