फसवणूक प्रकरणी बाँड रायटरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
एकत्र कुटुंबातील मिळकतीच्या वाटपाकरिता तीन बक्षीसपत्रांवर सर्व कुटुंबियांच्या स्वाक्षऱ्या करून दस्त नोंदविण्यास दिला. दोन मिळकतींच्या बक्षीसपत्राच्या नोंदणीवेळी संगनमत करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अर्चना श्रीधर देवसानी (वय ५०, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दामोदर लक्ष्मीपती देवसानी, अमित दामोदर देवसानी, अनिल दामोदर देवसानी, निर्मला दामोदर देवसानी (रा. प्लॉट नं. ७८, विणकर वसाहत, अक्कलकोट रोड, सोलापूर), गंगाधर लक्ष्मीपती देवसानी (रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर), गणेश पेंटा (रा. १४५ ए, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अर्चना देवसानी व दामोदर देवसानी आणि इतर सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. तर यातील गणेश पेंटा हा बाँड रायटर आहे.
४ डिसेंबर २०२४ रोजी दामोदर देवसानी, अमित देवसानी, अनिल देवसानी, निर्मला देवसानी यांनी गंगाधर देवसानी यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे बाँड रायटर गणेश पेंटा याला हाताशी धरून एकत्र कुटुंबातील मिळकतीच्या वाटपाकरिता तीन बक्षीसपत्रांवर सर्व कुटुंबियांच्या स्वाक्षऱ्या करून तो दस्त दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग २ उत्तर ३ सोलापूर या कार्यालयात नोंदविण्यास दिला. बक्षीसपत्राच्या नोंदणीवेळी दामोदर देवसानी व इतर पाच जणांनी संगनमत करून ही मिळकत अर्चना देवसानी यांच्या नावे न करण्याच्या उद्देशाने नोंदणी दस्तवेळी बायोमेट्री व अगुलीमुद्रा न देता परस्पर निघून जात फिर्यादी अर्चना देवसानी यांची फसवणूक केली, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अजित लकडे अधिक तपास करत आहेत.