जिल्हा न्यायालयाच्या इमारतीची १ मे रोजी पायाभरणी, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय उपस्थिती राहणार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाची सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन इमारत वाढत्या न्यायालयीन कामकाजामुळे अपुरी पडत आहे. त्यामुळे आता त्याठिकाणी प्रशस्त इमारत उभारली जाणार असून, या कामाचा पायाभरणी शुभारंभ १ मे रोजी होणार आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांच्यासह अन्य पाच न्यायमूर्तीची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सोलापूरवकील संघाकडून विधी व न्याय खात्याकडे २०१४ पासून नव्या इमारतीसंदर्भात पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून, नोव्हेंबर २०२२ मध्ये परिपत्रक जारी करून १०८ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली. अंदाजपत्रकात तरतूद करून निविदा प्रक्रिया अंतिम झाली आहे. आता इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरवात होणार असून त्याचा पायाभरणी समारंभ महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात होणार आहे. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार, सोलापूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण, सोलापूरचे भूमिपूत्र मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार, न्यायमूर्ती विनय जोशी व पालक न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला, सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम.एस. अझमी हे उपस्थित असणार आहेत. बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणतः दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याची माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुरेश गायकवाड यांनी दिली.
या इमारतीत कौटुंबिक, सहकार न्यायालय, शाळा न्यायाधिकरण, कामगार व औद्योगिक न्यायालय अशी सर्व न्यायालये एकाच छताखाली असणार आहेत.