अभाविपच्या प्रदेश अधिवेशनाचे पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन
विविध जिल्ह्यांतून येणार १५०० हून अधिक विद्यार्थी कार्यकर्ते

सोलापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापुरात होणाऱ्या ५९ व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन सोमवारी (दि.२३) सकाळी ११.१५ वाजता पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात २३, २४ आणि २५ डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन होणार असून या प्रांगणास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नाव देण्यात आले आहे. या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या आणि त्यावरील उपाय, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे योगदान आदी विषयांवर या प्रदेश अधिवेशनात मंथन केले जाणार आहे.
तीन दिवसीय अधिवेशनात विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत. त्यासोबतच नूतन प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश मंत्री यांची निर्वाचन प्रक्रिया, ‘ देव, देश आणि धर्म ‘, ‘अभाविप सर्वस्पर्शी सर्वव्यापी काम ‘, ‘ विकसित भारत @२०४७ ‘, या विषयांवर भाषण सत्रे, माहितीपर समांतर सत्र, हुनरबाज, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य शोभायात्रा व जाहीर सभा आणि नूतन प्रदेश कार्यकारणी घोषणा होणार आहे.
हे अधिवेशन निमंत्रित विद्यार्थी, विद्यार्थिनी कार्यकर्त्यांसाठी असून या अधिवेशनास उपस्थित रहावे, असे आवाहन अभाविपचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी केले.
या पत्रकार परिषदेस प्रदेश अधिवेशन स्वागत समितीचे सचिव सुहास जोशी, महानगरमंत्री यश उडाणशिव, प्रांत जिज्ञासा संयोजक रजनी गायकवाड उपस्थित होते.