करगुळे-भंडारे आक्रमक, मोची समाजाला न्याय मिळाला नाही म्हणून मध्य मध्ये उमेदवारी केली दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मोची समाजाला सोडला नाही, म्हणून सोलापुरात काँग्रेस पक्षातून बंडखोरी समोर आली आहे. शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेसचे एकनिष्ठ मतदान असलेल्या मोची समाजातून माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे आणि पक्षाचे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली होती. त्याप्रमाणे रीतसर अर्ज दाखल केला होता. अखेर पक्षातून समाजाला डावलण्यात आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्या रिक्त झालेल्या शहर मध्य या मतदारसंघातून मोची समाजातून उमेदवारी मागण्यात आली होती. समाजातील देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, संजय हेमगड्डी या तिघांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली परंतु पक्षाने या तिघांपैकी एकाचा ही विचार केला नाही. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेसचे उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या मोची समाजातील अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत.
बंडखोरी का केली.?
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने नाराजी व्यक्त केली. प्रणिती शिंदे यांच्या तिन्ही विजयात सिंहाचा वाटा असलेल्या समाजाने उमेदवारी मागितली परंतु आमच्याकडे दुर्लक्ष केले गेले. आमचा विचार झाला नाही त्यामुळे आम्ही बंडखोरी करत आहोत. अशी माहिती दिली. अंबादास करगुळे व देवेंद्र भंडारे यांनी दिली.