माजी महापौर शोभाताई बनशेट्टी शहर उत्तर मधून इच्छुक, बनशेट्टी भाऊजी राज्यातील नेत्यांच्या संपर्कात तर शोभाताई उत्तर मधील जनतेच्या संपर्कात

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत विधानसभा निवडणुकीचे, त्यातच सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या निवडून आले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप आणि मित्र पक्षाचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल याविषयी तयारी करण्यात येत आहे.
सोलापूर शहरातील शहर उत्तर, शहर मध्य, शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघापैकी उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सध्या भाजपकडे आहे तर मध्य हा काँग्रेस कडे आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे भाजपाचे आमदार असले तरी उत्तर मधील भाजपचे अनेक नेते विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. त्यापैकी माजी महापौर शोभाताई श्रीशैल बनशेट्टी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.
विजयकुमार देशमुख हे सलग चार टर्म आमदार आहेत जर पक्षाने इतर राज्यांतील पॅटर्न महाराष्ट्रात राबवला तर निश्चित या मतदारसंघात इतर कार्यकर्त्याला संधी मिळेल. त्यामुळे सोलापूरच्या भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून ज्यांना मान मिळाला. शोभा बनशेट्टी या शहर उत्तर मतदार संघातून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
महापौर असताना केलेल्या कामांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बनशेट्टी कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे, शोभाताईंचे सासरे हे महापौर होते. तसेच त्यांचे वडील माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे सुद्धा मोठे राजकीय व्यक्तिमत्व मानले जातात.
महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात शोभा बनशेट्टी यांनी उजनी समांतर जलवाहिनीच्या कामाला सभागृहात मंजुरी घेतली, हे त्यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाचे काम मानले जाते. कचऱ्याचे शेकडो कोटीचे टेंडर रद्द करून त्याच पैशातून थेट घंटागाड्या घेतल्या, त्यामुळे शहरातील कचऱ्याचा मोठा प्रश्न मिटला. मेन कचरा डेपो येथे विद्युत निर्मिती सुरू केली. महापालिकेच्या सर्व कार्यालयांवर सोलर पॅनल बसवले त्यामुळे दर महिन्याला एक कोटीची बचत झाली. पार्क मैदानाला सुशोभित करून हटके लूक दिला. अशी अनेक कामे त्यांची सांगता येतील.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर उत्तर मधील भाजपचे अनेक नेते इच्छुक आहेत. भाजप नेते श्रीशैल बनशेट्टी हे राज्यातील आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून उत्तरची उमेदवारी शोभाताई बनशेट्टी यांना कशा पद्धतीने मिळेल याची रचना करत आहेत तर माजी महापौर शोभाताई बनशेट्टी या शहर उत्तर मधील जनतेच्या संपर्कात आहेत. अशी चर्चा उत्तरं मधे रंगली आहे. येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी कोणाला संधी मिळेल हे पाहणे औचुकाचे ठरणार आहे.