मोफत मोफत मोफत.. 3 ते 12 जुलै अत्याधुनिक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, कोठे कोणी कशाचे केले आयोजन, वाचा सविस्तर..

सोलापूर : प्रतिनिधी
मुळव्याध, भगेंद्र, नासुर इत्यादी गुदद्वाराशी संबंधित आजार म्हटलं की, सांगताही येत नाही व दाखवता ही येत नाही अशी स्थिती होते. बरेचसे रुग्ण लाजे मुळे अशा आजारांसाठी डॉक्टरांना लवकर न दाखवता आजार अंगावर काढतात व आजाराची गुंतागुंत वाढवून ठेवतात, डॉक्टरांकडे दाखविले तरी सरकारी दवाखान्यात होणाऱ्या सर्वसामान्य शस्त्रक्रिया व उपचारांमुळे आजार बरा होण्यासाठी बराच कालावधी लागतो व खाजगी रुग्णालयातील लेझर, स्टेपलर अशा अत्याधुनिक शस्त्रक्रियांचा खर्च सामान्य गोरगरिब रुग्णांना परवडणारा नसतो.
याकरिताच श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर म्हणजेच सिव्हिल हाॅस्पीटल येथे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर व सह. प्राध्यापक डाॅ.औदुंबर मस्के यांनी गुदद्वाराशी संबंधित आजारांवर मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे.
या शिबिरात मूळव्याध (हिमोराईड), भगेंद्र (फिशर), नासुर (फीरटुला), केसतोडा अशा गुदद्वाराशी संबंधित आजारावर उपचार केले जाणार आहेत. स्टेपलर व लेझर अशा अत्याधुनिक पद्धतीने या शिबिरात शस्त्रक्रिया केल्या जाणार असून आधार कार्ड व रेशन कार्ड असणाऱ्या रुग्णावर मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक १३.०७.२०२४ रोजी होणार असले तरी व पूर्व नावनोंदणी व तपासणी अत्यावश्यक आहे. बुधवार दिनांक ३ जुलै ते गुरुवार दिनांक १२ जुलै २०२४ या कालावधीत सकाळी ०९.०० ते ११.३० या वेळेत रुग्णालयातील ओपीडी क्रमांक २७ येथे रुग्णांनी पूर्व नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालया तर्फे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व आयोजक डाॅ. औदुंबर मस्के यांनी केले आहे.