धाब्यांवर दारु पिणे पडले महागात, 2 हॉटेल चालकांसह 3 मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर परिसरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह तीन मद्यपी ग्राहकांना एकोणसाठ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरिक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर बाळे परिसरातील हॉटेल मनोरमा या ठिकाणी छापा टाकला असता धाबा चालक विश्राम मूलचंद यादव, वय 35 वर्षे हा ग्राहकांना धाब्यामध्ये दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले. या कारवाईत सुनील शंकर भोसले, वय 44 वर्षे रा. ढोमणे नगर बाळे व विशाल सुरेश जेधे वय 35 वर्षे रा. पद्मावती नगर बाळे या मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या तीन बाटल्या व इम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या चार बाटल्या व स्टील ग्लासेस असा 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एका अन्य कारवाईत सोलापूर- बार्शी रोड वरील खेड गावाच्या हद्दीतील हॉटेल राज मध्ये दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता धाबा चालक हनुमंत काशिनाथ तांदळे, वय 54 वर्षे रा. तोडकर वस्ती बाळे व मद्यपी ग्राहक नेताजी विठ्ठल खताळ वय 44 वर्षे रा. खेड यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 68 व 84 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिलीच्या दोन लूज बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, दारुबंदी न्यायालय ए. एस. बिरासदार यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा अशी शिक्षा सुनावली असता सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम एकोणसाठ हजार न्यायालयात जमा केली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, सुखदेव सिद, धनाजी पोवार, समाधान शेळके, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, अलीम शेख, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.