शाळा स्थलांतराची बनावट कागदपत्रं तयार करून शासनाची फसवणूक, विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
विद्यार्थी संख्या शून्य असल्याने शाळा बंद पडू नये, म्हणून स्थलांतराचा बनावट आदेश तयार करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्या प्रकरणी एका विरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर कसब्यातील काळी मशिदीजवळ या पत्त्यावर शाळा सुरू होती.
इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, सोलापूर या संस्थेची शाळा उत्तर कसबा येथे सुरू होती. विद्यार्थी संख्या नसल्याने ती बंद पडणार होती. ती बंद पडू नये व महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक फायदा मिळत राहावा म्हणून शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या २८ फेब्रुवारी २०१४ असा जावक क्रमांक नमूद असलेला शासन निर्णय बनावट तयार केला. तो बनावट शासन निर्णय शिक्षण विभाग पुणे यांच्या कार्यालयात २७ ऑक्टोबर २०१४ रोजी पूर्वी सादर केला.
बनावट आदेशाच्या आधारे पुणे शिक्षण विभागाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर यांच्याकडे संस्थेस स्थलांतर मान्यता देण्यात आल्याचे आदेश दिले महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर यांनी संस्थेचे स्थलांतर झाल्याचे पत्र दिले.
मात्र बनावट शासन निर्णय तयार करून पुणे येथील शिक्षण विभाग व पर्यायाने महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली, अशी फिर्याद रजनी मनोज राऊळ (वय ४३ रा. जुना विडी घरकुल एफ ग्रुप) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे पवन भालचंद्र बारगजे (रा. सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.
श्री व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित वेंकटेश विद्यामंदिर या शाळेचे स्थलांतर बनावट झालेले आहे सदर शाळा स्थलांतर होण्याअगोदर इंदिरा प्राथमिक शाळा इंदिरा सभागृह इंदिरानगर विजापूर रोड सोलापूर या शाळेमध्ये वेंकटेश विद्यामंदिर भरत होती त्यानंतर 28 फेब्रुवारी 2014 चे शासन पत्र बनावट तयार करून स्थलांतर झाल्याचे बनाव केले आहे त्यानंतर वेंकटेश विद्यामंदिर या शाळेचे नामांतर करून इंदिरा गांधी प्राथमिक शाळा असे नवीन नाव ठेवले आहे परंतु इंदिरा ज्ञानवर्धिनी संचलित सोलापूर यांची इंदिरा प्राथमिक शाळा ऑलरेडी आहे त्यामुळे ह्या शाळेचे नाव इंदिरा गांधी प्राथमिक शाळा असे नाव ठेवून दोन्ही शाळा एकच आहे असे दर्शविण्यात आले आहे त्यानंतर सदर इंदिरा गांधी प्राथमिक शाळा निर्मल सोसायटी आदित्य नगर येथील श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या इमारतीमध्ये ही शाळा भरत होती त्यानंतर ही शाळा इंदिरानगर पोस्ट ऑफिसच्या बाजूला श्री कुमार स्वामी मठामध्ये भरत आहे सद्यस्थितीत या सर्व गैर कारभार व अनियमितता बाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे या सर्व गैरकारभाराची सखोल चौकशी होऊन न्यायालयात सक्षम अशा दोषारोपण दाखल होण्याची गरज आहे.
श्रीराम बंडगर (मुख्य तक्रारदार)