बाळे खंडोबा देवस्थानची ६६ लाखांची फसवणूक

सोलापूर : प्रतिनिधी
बाळे येथील खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून जमीन खरेदीपोटी देवस्थानच्या बँक खात्यातून ६६ लाख ७६ हजार ६५ रुपये धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विनय विजय ढेपे, सागर चंद्रकांत पुजारी (रा. बाळे, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी देवस्थानचे पुजारी सिद्राम रघुनाथ पुजारी (वय ५८, रा. मारुती गल्ली, बाळे, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. खंडोबा देवस्थानचे ट्रस्ट आहे. त्याचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून ढेपे व पुजारी या दोघांनी त्यांना अधिकार नसतानाही देवस्थानसाठी जमिनीची खरेदी केली. व्यवहारानुसार ३१ जानेवारी २०२३ रोजी खरेदी दस्त (क्र. ५५७/२३) केले.
त्या जमिनीपोटी संबंधित मालकाला व मुद्रांक शुल्कापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाळे शाखेतील देवस्थानच्या खात्यातून ६६ लाख ७६ हजार ६५ रुपये काढून दिले. तसेच उर्वरित रकमेचा त्यांना धनादेश देऊन देवस्थानची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अजित पाटील तपास करीत आहेत.