भाजपा सदस्य नोंदणीत ‘अक्कलकोट’सह सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात राबविले जात आहे. त्याच धर्तीवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात देखील सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. या सदस्यता नोंदणी अभियानात पक्षामार्फत देण्यात आलेले सदस्यता नोंदणीचे १०० टक्के उद्दिष्ट सर्वात आधी अक्कलकोट मतदारसंघात पूर्ण झाले आहे. तसेच एकूण सदस्य नोंदणीत सोलापूर जिल्हा राज्यातील सर्वाधिक नोंदणीसह आघाडीवर असून या दोन्ही यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्यनशेट्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुंबईत झालेल्या कार्यशाळेत हा विशेष गौरव करण्यात आला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा आमदार तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष या नात्याने या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभिनंदन करून सत्कार केला.
मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते झालेला सत्कार हा माझ्या एकट्याचा नसून सदस्य नोंदणीसाठी समर्पित भावनेतून राबवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. सदस्य नोंदणीसाठी राबलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सलाम करतो. या विशेष सत्काराच्या निमित्ताने आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाचे चीज झाले, असे म्हणत आमदार सचिन कल्यनशेट्टी यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, राष्ट्रीय सह संगठन महामंत्री शिवप्रकाश जी, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, आमदार प्रविण दरेकर यांच्या अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.