संवेदनशील भावनेने समाजातील प्रत्येक घटकाकडे बघण्याची गरज : यमाजी मालकर

सोलापूर : प्रतिनिधी
भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूर तर्फे “समाज प्रबोधन सप्ताहाचे” आयोजन करण्यात आले होते. या समाज प्रबोधन सप्ताह अंतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून “भारत माझा-मी भारताचा” या विषयावर दैनिक सकाळ पुणे चे माजी संपादक व अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानाच्या सुरुवातीला अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूरचे संचालक प्रा. डॉ. एस.बी. सावंत यांनी प्रास्ताविक केले व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी समाज प्रबोधन सप्ताह साजरा करण्यामागचा हेतू विशद केला तसेच या सप्ताह अंतर्गत आयोजित करण्यात आलेला विविध उपक्रमांची माहिती करून दिली. प्रमुख वक्त्यांची ओळख एम.बी.ए. विभाग प्रमुख प्रा. सी.आर. सूर्यवंशी यांनी करून दिली.
प्रमुख वक्ते यमाजी मालकर यांनी आपल्या भाषणात भारत देश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या क्रमांकावर असून भारताला विविध नैसर्गिक स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्याचा फायदा करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात उपलब्ध असलेले तरुण मनुष्यबळ ही भारताची जमेची बाजू आहे परंतु अजूनही भारतामध्ये शिक्षणाचा अभाव दिसत असून जास्तीत जास्त लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचे मुख्य राष्ट्रीय उत्पन्न आज ही शेतीवर अवलंबून असून जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीने व तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून शेतीत पिकाचे उत्पादन चांगला प्रमाणात होईल. शेतात पिकलेल्या उत्पादनाला हमी भाव देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात व समाजातील शेवटच्या घटकाला एकत्र घेऊन आपण जर पुढे गेलो तरच भारताचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले व त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला संवेदनशील भावनेने बघणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
व्याख्यानाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. एस. एस. सूर्यवंशी यांनी केले व सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले यावेळी समाजकार्य विभागाचे संचालक डॉ. कीर्ती राज, भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. एस. के. मांडके, भारती विद्यापीठ ग. सा. पवार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.व्ही. डी. गोळे, भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर च्या मुख्याध्यापिका व्ही. एस. मोहोळे व शैक्षणिक संकुलातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.