व्यापारी अपहरणाचा कट उधळला, 8 कोटींच्या खंडणीसाठी रचला होता डाव, कोठे कसा घडला प्रकार.? वाचा सविस्तर..

सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार शुभम उर्फ पवन संजय श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. 8 कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.45 वाजता, श्रीश्रीमाळ यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. शेंगदाण्याच्या व्यापाराच्या बहाण्याने त्यांना भेटायला बोलवण्यात आले. मात्र, संशय आल्याने श्रीश्रीमाळ यांनी तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या क्रमांकांवरून त्यांना फोन येत राहिले, पण त्यांनी प्रत्येक वेळी संभाषण टाळले.
सायंकाळी 5.50 वाजता, बालाजी कॉलनी येथील त्यांच्या घरी दोन अनोळखी तरुण MSEB कर्मचारी असल्याचे सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, घरातील व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी त्यांना रोखले. त्यामुळे दोघेही तिथून निघून गेले.
या घटनेनंतर श्रीश्रीमाळ यांच्या मित्रांनी सतर्कता दाखवत मारुती स्विफ्ट डिझायर (MH12PQ6684) या गाडीने संशयितांचा पाठलाग केला आणि पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला. आकाश बरडे या संशयितांची चौकशी केली असता पुण्यातील अजिंक्य टोणपे, दक्ष पांडे, प्रथमेश वळामे आणि नवनाथ साळुंखे यांच्यासोबत मिळून मोठा कट रचल्याचे उघड झाले.
टोळीने गेल्या एक महिन्यापासून श्रीश्रीमाळ यांच्या हालचालींचे निरीक्षण केले होते. त्यांचे रोजचे वेळापत्रक, प्रवासाचे मार्ग, व्यवसायिक व्यवहार यांचा अभ्यास करून अपहरणाची संधी शोधत होते. टोळीकडे मफलर, वायर, चाकू यांसारखी हत्यारे सापडली आहेत.
या कटानुसार श्रीश्रीमाळ यांचे अपहरण करून 8 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा आणि त्यानंतर त्यांचा खून करण्याचा डाव होता. मात्र, श्रीश्रीमाळ यांची सतर्कता आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे हा कट उधळला.
या प्रकरणी बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असून, मास्टरमाइंड अजिंक्य टोणपे आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
बार्शीतील व्यापारी आणि नागरिकांनी सावधान राहावे, कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.