सोलापुरात होणार तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ‘मल्टि-मेगा’ इव्हेंट

सोलापूर : प्रतिनिधी
सिंहगड संस्थेच्या पुढाकाराने सोलापुरात प्रथमच विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी 3 ते 5 मार्च असे तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावर मल्टिमेगा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सिंहगड संस्थेच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटचे संशोधक संचालक, माजी कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हा कार्यक्रम स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सिंहगड इन्स्टिट्यूट आणि भारत सरकार च्या कृषी मंत्रालयातंर्गत डाळिंब राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRCP) यांच्या सहकार्यातून होत आहे. आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील नागरिकांना या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे. सोलापुरात प्रथमच विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी 3 ते 5 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सिंहगड महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील मल्टिमेगा कार्यक्रमाचे आयोजन केल आहे.
या कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्याने, शोध प्रबंधाचे सादरीकरण, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, विज्ञान प्रदर्शन, संशोधकांशी थेट संवाद, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा व नव उद्योजकांसाठी मार्गदर्शन अशा भरगच्च कार्यक्रमांसाठी विद्यार्थी , शिक्षक, संशोधक व शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन सोलापूर येथील सिंहगड संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी विद्यापीठाची रेशीम उद्योगाची फिरती प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांसाठी आकर्षण राहणार आहे.
3 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. स्मरणिकेचे प्रकाशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठचे कुलगुरू प्रा.डॉ. पी. ए. महानवर यांच्या हस्ते होणार आहे.
राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल (RGSTC) प्रकल्पाचा शुभारंभ सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.शिवराम भोजे ,(माजी संचालक, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र ) यांची तर डॉ. राजीव जोशी (कर्नाटक केंद्रीय विद्यापीठ, गुलबर्गा), NRCP चे संचालक डॉ.राजीव मराठे यांची उपस्थिती राहणार आहे. माजी कुलगुरू प्रा. एस एच पवार यांचे बीजभाषण होणार आहे. त्यानंतर मौखिक सादरीकरण होणार आहे.
4 मार्च रोजी कृषी मूल्यवर्धन आणि कौशल्य विकासाद्वारे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी उद्योजकता कार्यशाळा होणार आहे. प्रा. एस एच पवार लिखित “औषधी वनस्पती आणि त्यांच्या बायोनोकॉम्पोझिट्समधील नॅनोटेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन्स” या पुस्तकाचे प्रकाशन सकाळी दहा वाजता डॉ. आर. सेल्वराजन, संचालक, ICAR-NRC फॉर केळी, तिरुचिरापल्ली यांच्या हस्ते होणार आहे.
डाळिंब आणि केळीमध्ये मूल्यवर्धन आणि कौशल्य विकासावर कार्यशाळा होणार आहे. दुपारी डॉ. सोमनाथ पोखरे यांचे उद्योजकतेच्या संधी आणि डाळिंबातील वरिष्ठ वैज्ञानिक कौशल्य विकास (नेमॅटोलॉजी, ICAR-NRCP, सोलापूर उत्पादन उद्योग) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
उद्योजकता विकासासाठी केळीमध्ये प्रक्रिया आणि मूल्यवर्धनवर डॉ.सुरेश पी (प्र. शास्त्रज्ञ (हॉर्ट) यांचे मार्गदर्शन होणार आहे. दर्जेदार केळी उत्पादनासाठी कौशल्य विकास यावर डॉ . किरण जाधव (जळगाव) यांचे मार्गदर्शन होणार आहे. बाजरी, फुले आणि रेशीम शेतीमध्ये मूल्यवर्धन आणि कौशल्य विकासावर कार्यशाळा होणार आहे. उद्योजकता विकासासाठी फुलांमध्ये प्रक्रिया आणि मूल्यवर्धनावरही मार्गदर्शन होणार आहे. निर्यात गुणवत्तेच्या फुलांच्या उत्पादनाद्वारे उद्योजकता विकासावर डॉ. गणेश कदम, वरिष्ठ शास्त्रज्ञ (फ्लॉरीकल्चर), ICAR-DFR, पुणे यांचे मार्गदर्शन होणार आहे. नंतर रेशीम शेतीमध्ये कौशल्य विकासावर विनित पवार ( जिल्हा रेशीम विकास अधिकारी, सोलापूर) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
5 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 11.00 – इन्क्युबेटीस मीटचे उद्घाटन होणार आहे. नंतर तांत्रिक सत्रे होणार आहेत. दुपारी 2.00 ते 4.00 पर्यंत औद्योगिक संवाद होणार आहेत. डॉ. डी.डी. शिवगन, एनपीटीएल, दिल्ली, डॉ.पी.एस.पाटील, डॉ.एस.ए.देशमुख, डॉ.एसए हेमराज यादव, डॉ. दीपक सावंत यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी 12.00 ते 4.00 या वेळेत महाविद्यालयीन विद्यार्थीच्य टॅलेंट सर्च क्विझ स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत समारंभ व बक्षीस वितरण होणार असल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, सोलापूर विद्यापीठचे बी जे लोखंडे, एनआरसीपीचे राजीव मराठे, निलेश गायकवाड यांची उपस्थिती होते.