जिल्हा बँक : २३८ कोटी वसुली प्रक्रियेत अपिल केली, सुनावणीची मागणी, मंत्र्यांच्या तारखेकडे लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २३८ कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी १२ माजी संचालकांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपिलात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनवणी २ जानेवारीला घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीवर सहकारमंत्री पाटील यांच्याकडून अद्यापपर्यंत काहीही उत्तर आलेले नाही. या प्रकरणाची सुनावणी कधी होते आणि सहकारमंत्री पाटील काय निर्णय देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेने नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी ३५ जणांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये पैसे भरण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. कार्यवाहीचा आता पुढील टप्पा काय असणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. दरम्यान काही माजी संचालकांनी जिल्हा बँकेकडे या नोटीसवर प्राथमिक उत्तर दिल्याचे समजते. या उत्तरामध्ये माजी संचालकांनी आक्षेप नोंदवत मागणी नोटीस सदोष असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांच्च्या नियम १०७ (३) च्या अटींची पूर्तता न करता आपण नोटीस बजावलेली आहे.
त्यामुळे, कायद्याने विहित केलेल्या पद्धतीचा अवलंब करून नोटीस दिल्यास त्यास अंतिम व खुलासेवार उत्तर देण्याचे हक्क राखून प्रस्तुतचे प्राथमिक उत्तर दिले आहे. आपण ज्या रकमेची वसुली मागितली आहे. त्या-बाबत, मी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम ८८ अन्वये दिलेला आदेश रद्द करण्यासाठी अपीलिय प्राधिकरण राज्य शासन यांच्याकडे दाद मागितली आहे. मी अपीलिय प्राधिकरण राज्य शासन यांना विनंती देखील केली की लवकरात लवकर अपिलावर सुनावणी घ्यावी. त्यामुळे, कलम ८८ चे संबंधित आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम १५२ अन्वये अपील हा माझा वैधानिक अधिकार आहे जो मला महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याने प्रदान केला आहे. माझ्या स्थगिती अर्जावरील सुनावणीची वाट न पाहता जर तुम्ही तुमच्या मागणी नोटीसच्या संदर्भान प्रगती केली, तर ते माझ्या वैधानिक अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे. अपीलाची नोटीस त्याच्या परिशिष्टांसह तसेच स्थगिती अर्जासह आपणास दिली गेली असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.