पोलिस असल्याची बतावणी करून दागिने पळविणाऱ्या दोघांना अटक, सोने विकत घेणाऱ्या सराफालाही घेतले ताब्यात

सोलापूर : प्रतिनिधी
शहरात पोलिस असल्याची बतावणी करून महिलेच्या चार लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या पळविणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. एकाला पुणे तर दुसऱ्याला सांगली येथून ताब्यात घेतले. यात चोरीचा माल घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली.
कासिम युसूफ बैग (वय ३४, रा. शिवाजी नगर, पुणे) व महमद उर्फ जॉर्डन युसूफ इराणी (वय ३०, रा. सह्याद्री सोसायटी, खोजा कॉलनी, विश्रामबाग, सांगली) व सराफ सुनील वामनराव मानगावकर (वय ५५, रा. कुरणे गल्ली, नदी वेस, मिरज-सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ३० जुलै रोजी ६५ वर्षाच्या वृद्ध महिला जुळे सोलापुरातील संतोषी माता मंदिर परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी त्यांची वाट अडवत, आरोपींनी त्यांना आम्ही साध्या वेषातील पोलिस आहोत तुमचे सोने जाऊ नये म्हणून ते पर्समध्ये काढून ठेवा अशी सूचना केली. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने हातातील सोन्याच्या सुमारे ७०.३७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढल्या. तेव्हा संधी साधून दोघांनी त्यांच्या हातातील कडा कागदात गुंडाळून फिर्यादीच्या हातात दिला. त्यानंतर ते दोघे तेथून निघून गेले होते.
तपासात हा प्रकार इराणीने केला असल्याचे पुढे आले. पथकाने कासिम यास पुणे तर महमद यास मिरज सांगली येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दोघांवर 14 हून अधिक गुन्हे दाखल आहेत
गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसात १४ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तब्बल पाच महिन्यानंतर या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने केली.