मराठा आरक्षणासाठी 2 तरुणांनी स्वत:ला संपवलं, मन सुन्न करणाऱ्या घटनांनी मराठवाडा हळहळला

सोलापूर : प्रतिनिधी
सगेसोयरे आणि हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या जरांगेंच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.
उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असून सरकारने अद्यापही कोणतीही मागणी मान्य केलेली नाही. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. दुसरीकडे नैराश्यातून काही तरुण टोकाचं पाऊल उचलत आहेत.
अगदी काल परवाच धाराशीव येथील एका मराठा शेतकऱ्याने आरक्षणाची मागणी करत आपलं जीवन संपवलं होतं. ही घटना ताजी असतानाच मराठवाड्यात आणखी दोन तरुणांनी आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे.
साईनाथ सखाराम पडोळे (वय २६) आणि दादाराव रंगनाथ काकडे (वय ४०) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ हा हिंगोलीतील वसमत तालुक्यातील मुडी येथील रहिवासी होता. सोमवारी पहाटे अडीज वाजेच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी साईनाथने एक चिठ्ठी लिहून ठेवली. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत. परंतु सरकार दुर्लक्ष करत आहेत. म्हणून मी आत्महत्या करत आहे. या घटनेला सरकार जबाबदार आहेत, असा उल्लेख साईनाथने चिठ्ठीत केला. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.