पोलिसांना मिळेना धागेदोरे, बाजार समिती प्रशासन बेफिकीर, मार्केट यार्डमधील गोदाम फोडून साडेतीन लाखांची चोरी

सोलापूर : प्रतिनिधी
मार्केट यार्डमधील एका दुकानाच्या मागील गोदामाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने रोकड व वस्तू अशा तीन लाख ६४ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यातील फिर्यादी दिनेश जुगलकिशोर जाजू (वय ४१, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांचे मार्केट यार्डमध्ये अॅग्रोमिल इंडस्ट्री नावाचे दुकान आहे. गुरुवारी (ता. २६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. त्यानंतर चोरट्याने दुकानामागील त्यांच्या गोदामाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतील एक लाख रोकड, सिगारेट, क्लासिक आईसब्रस्ट, एनर्जी ड्रिंक, विड्या, सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा तीन लाख ६४ हजार १५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ पडसळकर तपास करीत आहे.
बाजार समिती प्रशासन बेफिकीर
शेतकरी, व्यापाऱ्यांच्या जीवावर बाजार समितीला उत्पन्न मिळते. मात्र, त्यांच्या मालासह दुकानांच्या सुरक्षेबाबत बाजार समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन सतत बेफिकीर राहिले आहे. त्याचा फटका शेतकरी, वाहनधारक, व्यापारी, आडते, दुकानदार यांना बसत आहे. तरीही बाजार समिती नेहमी सीसीटीव्ही बसवत असल्याचेच सांगते. पदाधिकारी व प्रशासनाला शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या नुकसानीची चाड नसल्याचेच चित्र आहे.
पोलिसांना मिळेना धागेदोरे
दिनेश जाजू यांच्या गोदामातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरच चोरट्यांनी चोरून नेला आहे. त्यामुळे चोरट्यांविषयी पोलिसांना धागेदोरे मिळू शकले नाहीत. शिवाय पोलिसांनी परिसरातील अनेक दुकानांतील सीसीटीव्ही तपासूनही चोरट्यांविषयी थांगपत्ता लागू शकला नाही.