फ्लॅट, गाळा देतो म्हणून सव्वा कोटीची फसवणूक, पुण्यातील गॅलोर डेव्हलपर्सचे संचालक थेपडे दांपत्याविरुद्ध गुन्हा

सोलापूर : प्रतिनिधी
मजरेवाडीतील पनाश प्रकल्पात दुकान गाळा व फ्लॅट देण्याच्या नावाखाली व प्रकल्पाच्या विकासासाठी एकूण ८५ लाख ५८ हजार रुपये घेतले. तसेच व्याजासह एकूण एक कोटी २५ लाख ३० हजार ५०० रुपये देतो म्हणून प्रतिज्ञापत्र देऊन मनोरमा बँकेचा न वठणारा धनादेश दिल्याप्रकरणी गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक असलेल्या पुण्याच्या थेपडे दांपत्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित अशोक थेपडे, मोनाली अमित थेपडे (रा. पुणे) अशी त्या – दाम्पत्याची नावे आहेत. व्यापारी शैलेंद्र किसन गायकवाड (वय ५१, रा. ए/३०१ ओपुला, २४ के., विशाल नगर, पिंपळे, निलेख, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. थेपडे दांपत्य हे गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी सोलापूरमधील मजरेवाडी येथील जुना सव्र्व्हे नं. ३१७/२बी/१ आणि ३१८/१ए/२ए, नवीन सर्व्हे नं. १२६/१७/२८/२अ व १२७/२व/१, चालू नवीन सव्र्व्हे नं. १२६/३/१/४ या जमिनीवर गॅलेक्सी पनाश या नावाने रहिवासी फ्लॅट व व्यापारी दुकानगाळे प्रकल्प चालू केला आहे. त्यांनी गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील दुकान गाळा क्रमांक २१ हा फिर्यादी गायकवाड यांना खरेदी देऊन जून २०२१ पर्यंत ताबा देतो, असे सांगून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेऊन रजिस्टर साठेखत लिहून दिले.
गॅलेक्सी पनाश हा प्रकल्प जलदगतीने विकसित करण्यासाठी त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. त्यांनी दिलेल्या मुदतीत गाळा क्र. २१ व रक्कम १५ लाख रुपये गायकवाड यांना परत दिले नाही. त्या बदल्यात त्यांच्याकडून आणखी ४ लाख ५८ हजार रूपये घेतले. गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील रहिवासी फ्लॅट क्र. १२०१ व १२०२ असे दोन फ्लॅट ६४ लाखाला खरेदी देतो असे सांगून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत दोन्ही रहिवासी फ्लॅटचा ताबा देतो असे सांगून त्यांनी त्यांच्या कडून घेतलेली रक्कम किंवा दोन रहिवासी फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. याशिवाय त्यांनी गायकवाड यांना विश्वासात घेऊन सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून आणखी १९ लाख रुपये घेतले. अशाप्रकारे त्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ८३ लाख ५८ हजार बँकेमार्फत घेतले. त्या बदल्यात फ्लॅटचा ताबा दिला नाही. याउलट त्यांनी फिर्यादीकडून घेतलेल्या एकूण रकमेच्या बदल्यात विविध व्याजदरानुसार १ कोटी २५ लाख ३० हजार ५०० रुपये देतो, असे सांगून ५०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र रजिस्टर नोटरीने लिहून दिले. तसेच सोलापूर मधील मनोरमा सहकारी बँकेचा न वटणारा धनादेश दिला. अशाप्रकारे त्यांनी गायकवाड यांची फसवणूक केली. याप्रकरणी फौजदार अशोक तरंगे तपास करीत आहेत.