
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ पर्यंत सोलापुरात ५७.६४ टक्के मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. सोलापूर मतदारसंघात १९६८ मतदान केंद्रांवर मतदान झाले. दोन ते तीन ठिकाणाचे अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले.
सोलापुरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह श्रीदेवी फुलारे, विनोद भोसले, वैष्णवी करगुळे हे नगरसेवक काँग्रेसचे होते. मात्र एका नगरसेविकेने काँग्रेसला राम राम करत वेगळा मार्ग पत्करला. तसा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु या भागात भाजप नेते नागेश खरात, गणेश नरोटे, गुरुभाई कवडे, शिवा कवडे, अजय यादव, अक्षय सूर्यवंशी, रोहित खताळ, माया यादव, हांनू शिरसागर, संस्कार नरोटे यांनी भाजपचे काम करत खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत आनली. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांना मतदान करून घेण्यासाठी चुरस पहावयास मिळाली.
मतदारांचा मतदानासाठी प्रचंड प्रतिसाद होता रखरखत्या उन्हातही काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 15 मध्ये जीव ओतून काम करत होते आणि आपल्या उमेदवाराला लीड कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. रामलाल चौकात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आजूबाजूला बसल्याने मतदारांना आपल्याकडे खेचण्यात रंगत पहायला मिळाली. यावेळी भाजपच्या गोठ्यातून जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय तर काँग्रेसच्या गोटातून जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. एकंदरीतच दोन्ही गटात उत्साह दिसून आला.
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानसेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न, शहरातील पिण्याचा पणाला प्रश्न, युवकांना रोजगार यासह विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रभाग क्रमांक 15 मधील मतदारांनी काँग्रेसला मतदान केले असून विजय आमचाच होणार असा दावा माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी केला.
देव देश आणि धर्मासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षात केलेल्या विकास कामाची दखल घेत भाजप उमेदवार राम सातपुते यांना प्रभाग क्रमांक 15 मधील मतदारांनी कौल दिला असून विजय आमचाच होणार असा दावा भाजप नेते गणेश नरोटे यांनी केला.
प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपा आणि काँग्रेस नेत्यांनी प्रभागातून लीड देत आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा केला आहे. परंतु मतदारांनी आपला कौल कुणाच्या बाजूने दिला हे निकाला दिवशीच निश्चित होईल. एकंदरीतच प्रभागातील लीडवरून आगामी नगरसेवकाची पायाभरणी कार्यकर्त्यांनी केल्याचे पहावयास मिळाल.