
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच अज्ञात कारणाने मारहाण केली असून यात तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे बाळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा मर्डर झाला की लखनचा नैसर्गिक मृत्यू झाला यावरून बाळे परिसरात चर्चेला उधाण आले होते.
मयत युवकास मित्रांनी मिळून अज्ञात कारणाने बार्शी रोडवरील एका अज्ञात स्थळी मारहाण केली. लखनला जबर मार लागला होता यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मयताच्या भावाला कळताच त्याने लखन यांस बाळे येथील घरी आणले त्यावेळी मात्र काही वेळाने लखनचा मृत्यू झाला असून याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे. सध्या अज्ञात मारेकरी फरार आहेत. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.