MPSC पास झालेल्या संजीवनी आणि सरोजिनी भोजने या दोन बहिणींचा खासदार प्रणिती शिंदे यांनी केला गौरव

सोलापूर : प्रतिनिधी
गवळी वस्ती मधील अतिशय गरीब परिस्थितीत जिद्दीने एमपीएससी पास झालेल्या संजीवनी ज्योतीराम भोजने आणि सरोजिनी ज्योतीराम भोजने या दोन सख्ख्या बहिणींचा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
घरचे अठराविश्व दारिद्र्य, आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलाचा गॅरेजचा तोडका- मोडका व्यवसाय, सहा माणसांचं कुटुंब चालविण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड, जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला-मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा. परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढनिश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील आठ पत्र्याच्या घरातील गॅरेज चालक ज्योतीराम भोजने यांच्या दोन्ही मुली संजीवनी ज्योतीराम भोजने आणि सरोजिनी ज्योतीराम भोजने अश्या दोन सख्ख्या बहिणीनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला.
याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन या दोघी बहिणींचा सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, मा. नगरसेवक गणेश वानकर, तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते.