सोलापूरकरांतून समाधान, नेटकऱ्यांनी केले कौतुक, अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठेंनी मांडला सोलापूरचा पाणी प्रश्न

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडला. आ. देवेंद्र कोठे यांनी पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडल्यामुळे सोलापूरकरांनी समाधान व्यक्त केले.
आ. देवेंद्र कोठे म्हणाले, उजनी धरण सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी असूनही सोलापूरला आठवड्यातून केवळ एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन पाणीपुरवठा करण्यात कमी पडत आहे. सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात येत असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या ११० किमी च्या कामापैकी १०६ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ ४ किमीचे काम राहिले आहे. दुहेरी जलवाहिनी कार्यान्वयित झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज किंवा किमान एक दिवसाआड पाणी मिळेल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. परंतु महापालिकेने अद्याप जलशुद्धीकरण केंद्राची जागाच ताब्यात घेतलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य कारणांमुळे हे काम थांबल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला हे काम पूर्ण करून घेण्याबरोबरच नियमित पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात आणि सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत केली.
आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडल्याचा व्हिडिओ मंगळवारी शहरात तुफान व्हायरल झाला. अनेक वर्षांपासूनची असलेली सोलापूरकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या विधानसभेत मांडल्याबद्दल नेटकऱ्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे समाज माध्यमांतून कौतुक केले.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य
सोलापुरात पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे सोलापूरला उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी मिळाली आहे. या दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करून घेण्याबरोबरच सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील.
आमदार देवेंद्र कोठे, शहर मध्य