मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत फेटा बांधणार नाही, भाजप आमदार राम सातपुतेंचा संकल्प
जो पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही तो पर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही, असा संकल्प सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला.

सोलापूर : प्रतिनिधी
जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही,’ असा संकल्प सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना राम सातपुते यांनी आपली भावना व्यक्त केली.
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळत आहे. आज भगवान महावीर जयंती निमित्त सोलापुरात जैन बांधवान कडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम सातपुते उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले राम सातपुते?
“मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांसमोर मी संकल्प केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, मार्गी लागत नाही. तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी फेटा घालणार आहे,” असे राम सातपुते यावेळी म्हणाले.
“हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली. या घटनेचा मी निषेध करतो. तसेच मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत,” असा आरोपही यावेळी राम सातपुतेंनी केला.