दैनिक सुराज्यचे पत्रकार रोहन नंदाने ‘बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट रिपोर्टर २०२४’ या पुरस्कारानं सन्मानित

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांचा मुंबई येथील गोल्डमॅन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विविध कार्यक्षेत्रात वावरणाऱ्या काही माणसांत एक कलाकार लपलेला असतो असं म्हटलं जातं. मराठी पत्रकारितेच्या पटलावर कार्यरत असलेला एक चेहरा म्हणून दैनिक सुराज्यचे पत्रकार रोहन नंदाने यांच्याकडं पाहिलं जातंय. रोहन नंदाने यांच्यात लपलेल्या कलाकाराला अभिनयाच्या पडद्यावर संधी मिळाली, या संधीचं रोहन नंदाने यांनी सोनं केलंय. त्यांना नुकतेच बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट रिपोर्टर २०२४ या पुरस्कारानं गौरविण्यात आलंय.
सोलापूरच्या पत्रकारिता क्षेत्रात रोहन संजय नंदाने यांनी सामाजिक क्षेत्राबरोबर क्राईम बीटने आपल्या पत्रकारितेस सुरवात केली. येथील दैनिक ‘सुराज्य’ मध्ये पत्रकारितेचं काम करत असताना सिने क्षेत्राच्या बातमीदारीकडंही आपला मोर्चा वळविला. नंदाने यांची काम करण्याची जिद्द आणि अखंड प्रयत्नाच्या भांडवलावर सुरु केलेल्या वाटचालीत नंदाने यांचा अनेक लहान मोठ्या कलाकारांसमवेत संबंध आला. एक पत्रकार म्हणून सिने जगताचा वार्तांकन करीत असताना रोहन नंदाने यांच्या लपलेला कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. छोट्या-मोठ्या पडद्यावर छोटा पुढारी म्हणून सर्वश्रुत असलेल्या घनश्याम दराडे याच्यापासून नामोल्लेखासाठी म्हणून निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह अनेक नामवंतांशी संपर्क आला.
पत्रकार नंदाने यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामाला पाहता-पाहता आठ वर्ष पूर्ण झाली. नंदाने यांनी पत्रकारिता करत असताना काही दैनिकात व चॅनलमध्ये विविध विषयावर लेखन केलं. त्या सोबत अभिनयाचा छंद सुद्धा जोपासला आहे.आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. आगामी काळात छत्रपती संभाजी महाराजांवरती “छावा” नावाचा हिंदी चित्रपट लवकरच सिने रसिकांच्या भेटीला येतोय. ‘छावा’ मध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासोबत रोहन नंदाने यांनी सेनापतीची भूमिका साकारलीय. त्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार, डॉक्टर, पत्रकार अशा आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. झी मराठी वाहिनीवरील मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ तसेच ‘तुला शिकवीन चांगला धडा’ मराठी मालिका तर स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ यासह अनेक मालिकांसह इंडियन प्रेमाचा लफडा, येक नंबर, छावा यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे.