दुःखद निधन.. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रमुख विश्वस्त डॉ स्वर्णलताताई भिशीकर यांचे निधन

सोलापूर : प्रतिनिधी
ज्ञान प्रबोधिनी सोलापूर हराळीच्या प्रमुख विश्वस्त, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ स्वर्णलताताई भिशीकर (वय ७४) ह्यांचे प्रदीर्घ आजाराने सोलापूर येथे काल रात्री दुःखद निधन झाले आहे. आज मंगळवार ४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता मोदी स्मशानभूमी येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार होतील.
डॉ लताताई मूळच्या पुणे येथील, प्रख्यात संपादक कै.चं.प. तथा बापूसाहेब भिशीकर ह्यांच्या कन्या, सोलापूर येथील केळकर दांपत्याने बालविकास मंदिर शाळा, ज्ञान प्रबोधिनीकडे हस्तांतरित केल्यावर त्या सोलापूरला स्थायिक झाल्या. ज्ञान प्रबोधिनी पुणेचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब पेंडसे ह्यांची जीवन मूल्ये त्यांनी तरुण वयात आत्मसात केली होती. पुढे शिक्षण तज्ञ कै.व.सी. तथा अण्णासाहेब ताम्हणकर ह्यांच्या नेतृत्वात त्यांनी ज्ञान प्रबोधिनीचे आजीवन कार्य करण्याचे व्रत निभावले. सोलापूर आणि हराळी येथे भव्य वास्तूंची निर्मिती आणि उत्तम संस्कार संपन्न तरुण पिढी घडविण्यात त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूकीची आदर्श प्रथा त्यांनी सोलापूरात यशस्वी करून दाखवली.
सोलापूरला आल्यावर त्यांनी प्रबोधिनीत सत्संग केंद्राची स्थापना केली. स्वरूप संप्रदायाचे स्वामी माधवनाथ ह्यांचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता. कर्तव्याशी बांधील राहून खरा परमार्थ कसा करावा ह्याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आचरणात आणला आणि ज्ञानेश्वरी, दासबोध, पतंजली योगसूत्रे ह्यांचेद्वारे नेमके मार्गदर्शन त्या साधकांना करीत असत. पुण्याचे डॉ माधवराव नगरकर तथा स्वामी माधवानंद ह्यांचे प्रमुख उपस्थितीत सत्संग शिबिरे, गुरू पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात लताताईंचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके,विविध इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे त्यांच्या विद्वत्तेचे प्रगल्भ दर्शन घडवतात.दिवंगत श्रेष्ठ संत विमलाजी ठकार ह्यांच्या प्रेरणेने मागील आठ दहा वर्षात दोन तीन वेळा त्यांनी संपूर्ण वर्षभर एकांतात अज्ञात स्थळी राहून मौनव्रत स्वीकारून ध्यान सेवा साधना केली होती.वंदनीय वै. भाऊ थावरे त्यांना “योगिनी” असे संबोधित असत, अशीच त्यांची सिद्धता होती.
त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे हे सतत जाणवत राहील.ज्येष्ठ मार्गदर्शक, ध्यानमार्गातील परिपक्व व्यक्तित्व आणि ज्येष्ठ भगिनीसम नात्याने मिळालेले त्यांचे प्रेम, जिव्हाळा, आशीर्वाद हेच पुढील वाटचालीत पथदर्शक ठरतील ह्याच कृतज्ञ भावना व्यक्त करून लताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो!
तैसें येणेंचि शरीरें | शरीरा येणें सरे | किंबहुना येरझारे | चिरा पडे ||* (श्रीज्ञानेश्वरी १२.१३६) हीच जीवन कृतार्थता त्यांनी साधली आहे. ज्ञान, ध्यान आणि भक्ती ह्यांनी ओतप्रोत भरलेले त्यांचे जीवन अनंतात विलीन होते आहे.
पुनश्च भावपूर्ण आदरांजली..