अतिक्रमण, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा : NCP

सोलापूर : प्रतिनिधी
शहरात मोक्याच्या ठिकाणी आपल्या व्यवसाय थाटून, रहदारीस अडथळा करणाऱ्या अतिक्रमण धारकांचा व भाजी मंडईमधील मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशा मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील मुख्य बाजरपेठेत व मोक्याच्या ठिकाणी फळ विक्रेते, फेरीवाले, भांडे विक्रेते, हारवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करत रहदारीस अडथळा केला आहे. त्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. शहरातील टिळक चौक, मधला मारुती सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, ७० फूट रोड, वाडिया हॉस्पिटल, फॉरेस्ट आदी भागात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याबरोबरच शहरातील विविध भाजी मंडईंमध्ये सुलभ शौचालयाची सोय नाही. सर्वत्र अस्वच्छता आहे. भाजी खरेदी करण्यासाठी मंडईत येणाऱ्या नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे याबाबत प्रचंड रोष आहे.
सोलापूर शहराची स्मार्ट सिटी म्हणून असलेली ओळख या गैरसोयीमुळे धूसर होत चालली आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना वैभव गंगणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.