पोलिस आयुक्त साहेब, समर्थ बरडेसह इतर समाज कंटकांवर गुन्हा दाखल करा : मल्हार प्रतिष्ठान

सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेलं डिजीटल बॅनर समर्थ बरडे आणि साथीदारांनी फाडून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे.
या संदर्भात सोमवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची शिष्टमंडळानं भेट घेऊन निवेदन सादर केले. मल्हार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने जुना पुणे नाका इथे २ जून रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेला डिजीटल बोर्ड रितसर परवानगी घेऊन पुणे नाका इथल्या बस थांब्यावर लावण्यात आलं होतं. मात्र हा बोर्ड समर्थ पुरुषोत्तम बरडे आणि साथीदारांनी फाडून समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे.
समर्थ बरडे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून, या घटनेच्या अनुषंगानं पुणे नाका इथं उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभर साजरी होत असताना, त्यांच्या विचारधारेचा आदर करणाऱ्या समाज बांधवांच्या भावना जाणीव पूर्वक दुखावल्या आहेत, अशा भावना ही या निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडं व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी अर्जुन सलगर, मनिषा माने, राम वाकसे, सुधीर सलगर, सुजीत खुर्द, मनोज सलगर, सदाशिव सलगर, शेखर बंगाळे, सुरज देवकते यांच्यासह अन्य समाज बांधव आणि मल्हार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.