19 जून पोलीस भरती, काय आहे नियम, अवश्य वाचा..

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणे करिता पोलीस भरती प्रक्रिया बुधवार दिनांक १९ जून २०२४ रोजी पासून सर्व पोलीस घटकात सुरु होणार आहे. पोलीस शिपाई भरती-2023 च्या अनुषगाने पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर आस्थापनेवरील 34 पोलीस शिपाई व 16 चालक पोलीस शिपाई असे एकुण 50 रिक्त पदाकरीता पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या करीता पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे पोलीस शिपाई पदासाठी 1540 व चालक पोलीस शिपाई पदासाठी 834 असे एकूण 2374 आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान
1. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल.
2. काही उमेदवारांनी पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बँन्ड्समन व कारागृह पोलीस शिपाई अशा वेगवेगळ्या पदांकरिता वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केला असेल आणि अशा उमेदवारांना दोन किंवा अधिक ठिकाणी एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांनी या बाबत पुराव्यानिशी विनंती अर्ज केल्यास या त्यांना मैदानी चाचणीसाठी पर्यायी दिनांक दिला जाईल.
3. याव्यतिरीक्त काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.
सोलापूर शहर येथिल पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार असून उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
१) उमेदवाराने पोलीस भरती प्रकियेदरम्यान गैरशिस्त अथवा अशोभनिय वर्तन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
२) उमेदवारास मोबाईल फोन मैदानात आणण्यास प्रतिबंध आहे.
३) उमेवाराने मैदानी चाचणीसाठी येतांना प्रवेशपत्र व आवेदन अर्जात नमुद कागदपत्रे / प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. तसेच नुकतेच काढलेले किमान 3 पासपोर्ट साईझ फोटो सोबत आणावेत.
४) उमेदवाराने प्रत्येक मैदानी चाचणी झाल्यावर आपले गुण बरोबर असल्याची खात्री करूनच नंतर सही करावी, चाचणी संपल्यानंतर उमेदवाराने गुणांबाबत केलेली कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
५) उमेदवाराचे मैदानी चाचणीत मिळवलेले गुण रोजचे रोज पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर येथे नोटीस बोर्डावर लावण्यात येतील. तसेच सोलापुर शहर पोलीस संकेतस्थळ, फेसबुक व ट्विटर अकांऊन्ट येथे प्रसिध्द करण्यात येतील,
६) उमेदवारांस लेखी परिक्षा व कौशल्य चाचणीची तारीख व वेळ यथावकाश कळविण्यात येईल.
७) सदर भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जात असुन, उमेदवाराने कोणताही गैरप्रकार केल्यास त्याबर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
८) तसेच, उमेदवारांनी कोणत्याही अफवांना अगर अमिषांना बळी पडून स्वतःचे नुकसान व फसवणूक करून घेवू नये.
९) उमेदवारांकडून सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने या अथवा इतर कार्यालयाकडील कोणताही अधिकारी / अंमलदार / लिपीक / त्रयस्थ व्यक्ती भरती करून देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास, अथवा सदर भरती प्रक्रिया संदर्भात कोणत्याही प्रकाराचा गैरप्रकार अथवा भ्रष्टाचार आढळून आल्यास त्याबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत केले.