सोलापूरक्राईमधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

विशालगडावर ‘ती’ जागा सोडून अन्य कुठेही पशूबळी दिला गेल्यास कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती आक्रमक

सोलापूर : प्रतिनिधी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी देण्यास अनुमती दिलेला मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश हा केवळ संबंधित याचिकाकर्त्यांसाठीच आहे, तोही केवळ 15 ते 21 जून 2024 या कालावधी साठीच आहे, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. हा आदेश याचिकर्त्यांच्या खासगी जागेपुरताच म्हणजे ‘गट क्रमांक 19’साठी आणि तोही बंदीस्त जागेपुरताच लागू आहे. न्यायालयाने ही मान्यता देतांना सर्व प्रशासकीय गोष्टींची पूर्तता करूनच पशुबळी देण्यास अनुमती दिली आहे. मात्र जणू काही कुर्बानीचा हा आदेश सर्वांसाठी आणि संपूर्ण विशाल गडावर लागू झाला आहे, अशी वृत्ते प्रकाशित झाली आहेत, ती निराधार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशालगडाचे पावित्र्य आणि स्वच्छता राखली गेली पाहिजे. गडकोटांचे पावित्र्य राखण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी याचिकाकर्त्याच्या बंदिस्त जागा सोडून संपूर्ण विशाळगडावर अन्य कुठेही पशूबळी जाणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. जर या जागेव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही पशूबळी दिला गेला, तर तो न्यायालयाने दिलेल्या अटींचा भंग असेल, यानंतर जर काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’चे प्रवक्ते सुनील घनवट यांनी दिला.

या वेळी न्यायालयाच्या अटींचा भंग करणार्यांवर तत्काळ गुन्हे नोंदावावेत, अशी मागणीही घनवट यांनी केली. पुरातत्व खात्याच्या ताब्यातील छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांवर निर्णय नाही, मात्र कुर्बानीसाठी लगेच निर्णय जातो याकडेही घनवट यांनी लक्ष वेधले.

घनवट पुढे म्हणाले की, हा आदेश शुक्रवारी 14 जून यादिवशी पारित झाल्यानंतर 15 आणि 16 जून 2024 या दिनांकांना शनिवार-रविवार असल्याने यांना प्रशासकीय अनुमती कशी मिळाली ? कि केवळ अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनासाठी शनिवारी-रविवारी प्रशासनाने सुटीच्या दिवशी पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अतिरिक्त काम केले? हे प्रशासनाने स्पष्ट करायला हवे. तसेच हा आदेश तात्पुरत्या स्वरूपाचा असून कालावधी संपल्यावरही तेथे पशुहत्या होते का? याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्व ठिकाणांचे CCTV मधून चित्रीकरण करून पुरावे ठेवावेत. तसेच गडावरील पर्यावरण सुरक्षित रहावे आणि कोणत्याही प्रकारे प्रदूषण होऊ नये म्हणून या मांसाच्या उर्वरित अवशेषांची विल्हेवाट कशी लावणार ते प्रशासनाने संबंधिताकडून लिहून घेऊन घोषित करावे. अन्यथा त्याविरोधात हरित लवादाकडे तक्रार करण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडाचे पावित्र्य कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे दायित्व प्रशासनाचे आहे. तसे न झाल्यास सर्व शिवप्रेमीच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल, तसेच ही कुर्बानी दिली जात असतांना हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाला तेथे काही गैरप्रकार घडत नसल्याचे खात्री करण्याची व्यवस्था असावी. या संदर्भात गडप्रेमींनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!