लोकसभेला भाजप नेत्यांनी प्रणिती शिंदेना मतदान केले, सुशीलकुमार शिंदेचा गौप्यस्फोट, राजकीय वातावरण तापले

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत मतदार जनतेने निवडून दिल्याबद्दल तसेच मविआच्या घटक पक्षांनी साथ दिल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदेंकडून मतदारसंघात ठिकठिकाणी कृतज्ञता मेळावे घेतले जात आहे. त्याचाच भाग म्हणून आज अक्कलकोट रोडवरील राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलतांना माजी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेंनी हे विधान केलं. ते म्हणाले,
मी आतापर्यंत 9 ते 10 निवडणुका लढवल्या आहेत. यंदाची निवडणूक आमच्यासाठी खूप सोपी होती. मला सर्वात कमी त्रास या निवडणुकीत झाला. विरोधी पक्षाचे लोक निवडणुकीत पैसै वाटप करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आम्हाला त्यांची पर्वा नव्हती. कारण जनता आमच्यासोबत होती, असं ते म्हणाले.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. मी त्या सर्वांना धन्यावाद देतो, असं शिंदे म्हणाले.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे याचं विधान सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापवणारे ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या नेत्याने प्रणिती शिंदे यांना लोकसभेला मदत केली, अशी चर्चा आता सोलापूरमध्ये रंगू लागली आहे. भाजपमध्येही आता एकमेकांकडे संशयाने पाहिले जात आहे.