गोळ्या घातल्या परंतु तू वाचला आता तुला सोडणार नाही, शिवसेना उपनेते शरद कोळींना जिवे मारण्याची धमकी

सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना उबाठा गटाचे उपनेते शरद कोळी यांना शनिवारी एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोळी यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शरद विठ्ठल कोळी, रा. अर्धनारी, ता. मंगळवेढा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. वाळू माफियां विरुद्ध त्यांनी अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्यास भाग पाडले होते. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पत्रकार भवनजवळ संतोष पाटील यांच्या फोनवर अण्णाराव ऊर्फ पिंटू पाटील, रा. शेगाव, ता. अक्कलकोट याने फोन केला. त्यावेळी त्याने ‘गेल्या वेळेस काही लोक अंगावर घालून गोळ्या घातल्या होत्या. परंतु, तू वाचला, आता तुला सोडणार नाही. जिथे दिसेल तिथे तुला बंदुकीच्या गोळ्या घालण्या संदर्भात काही लोकांना सांगितले आहे आणि शरद कोळी याचे सोलापूरमधील ऑफिस जाळून टाकीन’ अशी धमकी दिली.
तसेच ‘शरद कोळी यास सांग’ असेही तो फोनवर बोलला. संतोष पाटील यांनी ही माहिती शरद कोळी यांना दिली व कोळी यांनी अण्णाराव ऊर्फ पिंटू पाटलाविरुद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.